विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थाकडे
By Admin | Updated: May 13, 2014 19:16 IST2014-05-13T18:13:12+5:302014-05-13T19:16:17+5:30
ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक गावात जि.प. च्या उर्दू आणि मराठी शाळांत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध क रू न दिल्या; परंतु शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांची नीट अंमलबजावणीच होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांचा दर्जा खालावत असून, भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थांकडे वळत आहे.

विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थाकडे
बाभुळगाव जहागीर: ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक गावात जि.प. च्या उर्दू आणि मराठी शाळांत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध क रू न दिल्या; परंतु शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांची नीट अंमलबजावणीच होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांचा दर्जा खालावत असून, भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थांकडे वळत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावा, शिक्षणाची गंगा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचावी, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शासनाने सर्वशिक्षा अभियान योजना अस्तित्वात आणली. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक गावातील जि.प. मराठी आणि उर्दू शाळांसाठी सुसज्ज अशा इमारती बांधल्या. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पोषण आहार, गणवेश, पुस्तके, दप्तर आदी सुविधाही पुरविल्या, तसेच प्रत्येक शाळेत संगणक आणि प्रयोगशाळेची सुविधाही उपलब्ध करून दिली. महत्त्वाचे म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहणे आवश्यक केले. या सर्व सोयी-सुविधांमुळे ग्रामीण भागांसह शहरात असलेल्या शासकीय शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, हा शासनाचा विचार फोल ठरला कारण या सोयी-सुविधांची नीट अंमलबजावणीच केल्या जात नसून, कित्येक शाळांतील शिक्षक मुख्यालयीसुद्धा राहत नाहीत. कित्येक ठिकाणी संगणक असूनही विद्यार्थ्यांना त्या संदर्भातील ज्ञान दिले जात नाही. अनेक ठिकाणच्या शाळांत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नाही, तर अनेक ठिकाणी तो काळजीपूर्वक तयार केला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. शाळा प्रशासनाचे उदासीन धोरण आणि शिक्षकांच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा दिवसंेदिवस खालावत चालला. परिणामी पाल्याच्या भविष्याचा विचार करून पालकवर्गाचा कल खासगी शिक्षण संस्थाकडे वळू लागला आणि शासकीय शाळा ओस पडू लागल्या. अतिरिक्त शिक्षकांची संख्या, तुकड्या कमी होत चालल्या. दुसरीकडे खासगी शिक्षणसंस्थांच्या योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीमुळे त्यांच्या शाळांमधील पटसंख्या वाढतच आहे. खासगी संस्थाचालक आपल्या शिक्षकांकडून काम योग्य पद्धतीने करून घेत असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खूप उंचावला. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारीही शासकीय शाळांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. खासगी शाळांत अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा असून, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. एकंदरीत चित्र पाहता गैरसोयींमुळे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे.