Husband and wife arrested for murder of teenager | युवतीच्या खून प्रकरणात पती-पत्नी अटकेत
युवतीच्या खून प्रकरणात पती-पत्नी अटकेत


अकोला : डाबकी रोडवरील एका शेतात आढळलेल्या युवतीच्या हत्याकांडात डाबकी रोड पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडले की आणखी दुसऱ्या कारणातून, याचा तपास पोलीस करीत आहेत.
६ आॅक्टोबर २०१९ रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गजानन नगर येथील रेल्वे लाइनला लागून असलेल्या गुरुखुद्दे यांच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते; मात्र पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरून महिलेचे बानू ऊर्फ नेहा राजू यादव रा. जहागीर गिरी, दिल्ली असे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून नासिर खान अजिज खान (वय ५२) व समिनाबी नासिर खान रा. जरीमरी साकीनाका, मुंबई यांना अटक केली. या दोघांनी संगनमताने बानूचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हत्याकांडाचे दिल्ली ते मुंबई कनेक्शन
सदर युवती हे दिल्ली येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, तर तिची हत्या करणारा दाम्पत्य हे मुंबईतील असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे, या हत्याकांडाचे थेट दिल्ली ते मुंबई कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात समोर येत असून, एक मोठे रॅकेट यामध्ये सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Husband and wife arrested for murder of teenager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.