कोरोनामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 11:38 IST2020-03-29T11:37:48+5:302020-03-29T11:38:03+5:30
. हिंगणा रोडवरील एक महिला आणि तिची पाच मुले दोन दिवसांपासून उपाशी होती.

कोरोनामुळे त्यांच्यावर आली उपासमारीची वेळ
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: कोरोना विषाणू जगभर थैमान घालत आहे. संचारबंदी लागू केली असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. हिंगणा रोडवरील एक महिला आणि तिची पाच मुले दोन दिवसांपासून उपाशी होती. याबाबतची माहिती शेजाऱ्यांनी बालकल्याण समितीला दिली. समिती सदस्यांनी आता या कुटुंबाची दोन वेळच्या जेवणाची सोय लावून दिली आहे.
शुक्रवारी बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांना एका महिलेने फोन करून हिंगणा रोडवरील खडकी भागातील एक कुटुंब दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगितले. कुलकर्णी यांनी समिती सदस्यांना घेऊन या भागाची पाहणी केली असता, एक महिला तिचे पाच मुले उपाशी असल्याचे आढळले. दोन-तीन दिवस शेजाऱ्यांनी या कुटुंबाला जेवण दिले; मात्र रोज शक्य नसल्याने शेजाºयांनीदेखील पाठ फिरविली. ही महिला कामगार असून, रोजंदारीने कामावर जाते. भाड्याच्या खोलीत राहते. सोबत छोटी पाच मुले. एवढ्यांचा सांभाळ एकटी करीत असल्याची माहिती तिने समितीला दिली. पल्लवी कुळकर्णी यांच्यासेबत सदस्य अॅड. सुनीता कपिले, प्रीती वाघमारे, नीलेश पेशवे, बाल संरक्षक कक्षेचे सुनील लडोलकार यांनी महिलेची संपूर्ण विचारपूस केली. खदान पोलीस स्टेशनला माहिती दिली. नगरसेवक यांना बोलावून कुटुंबाची दोन वेळच्या जेवणाची सोय करण्याबद्दल सांगितले. काल शुक्रवारी आणि आज शनिवारी बालकल्याण समिती सदस्यांनीच या कुटुंबाची जेवणाची सोय केली. नगरसेवक गणेश पावसाळे, बालकल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, सदस्य अॅड. सुनीता कपिले यांनी शनिवारी सायंकाळी या महिलेला अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू नेऊन दिल्या.
गरिबाले कोरोना होत नाही!
समिती सदस्य जेव्हा या कुटुंबाला शोधत फिरत होते, तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार हेच ते कुटुंब असल्याचे निदर्शनास आले. बाई बाहेर बसली होती. मुले बाहेरच खेळत होती. त्यातील दोन रस्त्यांवरच लोळत होती. हे दृश्य पाहून समितीने त्या बाईला घरातच राहा, मुलांना सांभाळ, असे समजून सांगितले; मात्र या महिलेने कोरोना गरिबायले होत नसते, असे म्हटले.
नगरसेवकांनी घ्यावी काळजी
आपल्या प्रभागातील गरीब व गरजू नागरिकांची काळजी नगरसेवकांनी घेणे आवश्यक आहे. कोरोना संदर्भातील माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य नगरसेवकांचे आहे,असे या प्रकारावरून अधोरेखित होते.
पाच मुलांची करणार सोय
महिलेच्या विनंतीवरून तिच्या पाचही मुलांची निवास व भोजनाची व्यवस्था बालकल्याण समितीमार्फत केली जाणार आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर या मुलांना शैक्षणिक सुविधादेखील पुरविण्यात येणार येईल.
- अॅड. सुनीता कपिले, सदस्य, बालकल्याण समिती
अकोला.