अमरावती विभागातील शेकडो लघुप्रकल्प कोरडे!
By Admin | Updated: January 27, 2016 23:24 IST2016-01-27T23:24:44+5:302016-01-27T23:24:44+5:30
भीषण पाणीटंचाईचे संकेत; प्रशासनाचा कृती आराखडा कागदावरच.

अमरावती विभागातील शेकडो लघुप्रकल्प कोरडे!
सुनील काकडे/वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात संपूर्ण विदर्भात अल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. अशातच रब्बी हंगामातील पिकांसाठी झालेला उपसा आणि जमिनीची होणारी धूप या कारणांमुळे सद्यस्थितीत अमरावती विभागातील ४२८ लघुसिंचन प्रकल्पांपैकी सुमारे २५0 प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांची पाणी पातळीदेखील झपाट्याने खालावत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे.
सद्यस्थितीत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील ४२८ लघुप्रकल्पांमध्ये केवळ २0 ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील १0७ पैकी तब्बल ६0 प्रकल्प कोरडे पडले असून, उर्वरित चार जिल्ह्यांमध्येही भयावह स्थिती उद्भवली आहे. हातपंप, कूपनलिका, विहिरी हे जलस्रोतदेखील कोरडे पडल्याने जनमानसासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. तथापि, जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा कागदोपत्री तयार करण्यापलीकडे कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. वाशिम जिल्ह्यात साडेपाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा कृती आराखडा तयार आहे; पण ७९३ पैकी ५६0 गावे टंचाईग्रस्त असताना एकाही गावात अद्याप साधे टँकरदेखील सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे.
जलयुक्त शिवारचा फुगा हवेतच विरला!
मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविले. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधी लिटर पाण्याची साठवण झाल्याचा आव प्रशासकीय पातळीवरून आणण्यात आला; मात्र सध्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईने राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
अख्खा मराठवाडा तहानला!
महाराष्ट्रातील इतर विभागांच्या तुलनेत यंदा मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचे चटके जास्त सोसावे लागत आहेत. मराठवाड्यातील ७२८ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस उणापुरा दोन ते अडीच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५00 पेक्षा जास्त प्रकल्प कोरडेठण्ण पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा, उस्मानाबादमधील निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि नांदेड जिल्ह्यातील मनार या पाच प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहोचली असून, जायकवाडी, पूर्णा येलदरी, पूर्णा सिद्धेश्वर, ऊध्र्व पैनगंगा, विष्णुपुरी, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प अल्पावधीतच कोरडे पडतील, अशी भीती वर्तविली जात आहे.