हाॅटेल व्यावसायिकाला खंडणी मागणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:05+5:302021-02-05T06:17:05+5:30
अकोला : शहरातील गुंडांनी आता पुन्हा एकदा त्यांची दादागिरी सुरू केली असून, गणराया हाॅटेलच्या मालकास भरदीवसा शस्त्राच्या धाकावर खंडणी ...

हाॅटेल व्यावसायिकाला खंडणी मागणारे जेरबंद
अकोला : शहरातील गुंडांनी आता पुन्हा एकदा त्यांची दादागिरी सुरू केली असून, गणराया हाॅटेलच्या मालकास भरदीवसा शस्त्राच्या धाकावर खंडणी मागणाऱ्या दाेन जनांना रामदास पेठ पाेलिसांनी अटक केली. हाॅटेलच्या गल्ल्यातील एक हजार ५०० रुपयांची रक्कमही या दाेघांनी पळविली हाेती.
रामदास पेठ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या रतनलाल प्लॉट चौकातील गणराया हॉटेलच्या मालकाला आंबेडकरनगरातील रहिवासी अनिल रताळ व अनिल घ्यारे या दोन कुख्यात गुंडांनी व्यवसाय चालू ठेवण्यासाठी २५ हजारांची खडणी मागीतली. त्यानंतर, त्याच्याजवळील पंधराशे रुपये हिसकावून घेतले उर्वरित रक्कम न दिल्यास तुला गोळ्या घालून ठार करू, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेले हाॅटेल मालक रवी रमेशचंद्र डीडवाणी यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य पाहता, रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी तातडीने तपास सुरू केला. या गुन्ह्यातील आरोपी हे आंबेडकर नगर येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे दाेघेही टॉवर चौकात फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरून अनिल रताळ व अनिल घ्यारे या दाेघांना रामदास पेठ पाेलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५५० रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत इंगळे, शेख हसन, किशोर गवळी, संजय अकोटकर, गजानन खेडकर, अनसार शेख, स्वप्निल चौधरी, श्रीकांत पातोंड, विशाल चौहान यांनी केली.