शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
By Admin | Updated: May 14, 2017 20:28 IST2017-05-14T20:28:19+5:302017-05-14T20:28:19+5:30
अखिल भारतीय छावा संघटनेचा पुढाकार : छत्रपती संभाजी महाराज जयंती

शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
अकोला : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रविवारी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला, तसेच आत्महत्याग्रस्त अपात्र शेतकऱ्यांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, मार्गदर्शक डॉ. दीपक मोरे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हाध्यक्ष रणजित काळे, चंदकांत झटाले, पंकज देशमुख, प्रवीण झापर्डे, जिल्हा संघटक प्रमोद देंडवे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत बगाडे, जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गोतमारे आदी मान्यवर विचारपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पूजन, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आत्महत्याग्रस्त अपात्र शेतकरी कुटुंबीयांना २० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात जया निंबोकार, मनोरमा इंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीन वितरित करण्यात आली. शहीद आनंद गवई व खंडारे यांच्या कुटुंबीयांचा साडी-चोळी, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित काळे यांनी केले. यामध्ये एक हजार शेतकऱ्यांना अपघाती विम्याचे कवच प्रदान करण्याचा संकल्प करण्यात आला. संचालन प्रमोद देंडवे, तर आभार योगेश गोतमारे यांनी मानले.
शहरातून निघाली मोटारसायकल रॅली
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रविवार, १४ मे रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ( भारत महाविद्यालय मैदान) येथून भव्य मोटारसायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या मोटारसायकल रॅलीला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह मान्यवरांनी भगवी पताका दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली दुर्गा चौक, बिर्ला रोड, स्टेशन मार्गे शिवाजी पार्क, टिळक रोड, सिटी कोतवाली, नवीन बसस्थानक, पोस्ट आॅफिस, सिव्हिल लाइन मार्गे जवाहर नगर चौक, जठारपेठ चौक या मार्गे जाऊन न्यू तापडिया नगरातील छावा बालोद्यान येथे समारोप करण्यात आला.