एचआयव्ही संक्रमित रक्त प्रकरण; वादग्रस्त बी.पी ठाकरे रक्तपेढी सील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 10:53 IST2021-09-05T10:50:18+5:302021-09-05T10:53:08+5:30
BP Thackeray blood bank sealed : आठ महिन्यांच्या चिमुकलीला ‘ब्लड ट्रान्समिशन’द्वारे एचआयव्हीची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली हाेती

एचआयव्ही संक्रमित रक्त प्रकरण; वादग्रस्त बी.पी ठाकरे रक्तपेढी सील!
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्तपुरवठ्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या अकोल्यातील बी.पी. ठाकरे मेमोरियल रक्तपेढीला सीलबंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले. मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील आठ महिन्यांच्या चिमुकलीला ‘ब्लड ट्रान्समिशन’द्वारे एचआयव्हीची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली हाेती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या केंद्रीय पथकाच्या मार्गदर्शनात मागील दोन दिवसांपासून अकोल्यातील बी.पी. ठाकरे मेमोरियल रक्तपेढीची कसून चौकशी करण्यात आली. सुमारे दोन दिवसांच्या काळात पथकाने रक्तपेढीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत हा अहवाल जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे सोपविण्यात आला. अहवालानुसार, बी.पी. ठाकरे रक्तपेढीच्या कामात काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बी.पी. ठाकरे मेमोरियल रक्तपेढीला तत्काळ सीलबंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले.
अन्न व औषध प्रशासन घेणार अंतिम निर्णय
दोन दिवसांच्या चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकारी यांनी वादग्रस्त ठरलेल्या बी.पी. ठाकरे रक्तपेढीला सीलबंद करण्याचे आदेश दिले. तसेच हे प्रकरण पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरित केले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनामार्फत या प्रकरणाची आणखी कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच रक्तपेढीवर अंतिम कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही रक्तपेढी सीलबंद राहणार आहे.
चिमुकलीला संक्रमित रक्ताचा पुरवठा प्रकरणी बी.पी. ठाकरे रक्तपेढीचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चौकशीदरम्यान रक्तपेढीच्या कार्यपद्धतीत काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत.
- डॉ. वंदना वसो (पटोकार) जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
बी.पी. ठाकरे रक्तपेढीच्या चौकशी अहवालामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ही रक्तपेढी तत्काळ सीलबंद करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला