पोलिसांच्या समस्यांसाठी हेल्पलाईन!
By Admin | Updated: May 14, 2014 20:09 IST2014-05-14T19:48:47+5:302014-05-14T20:09:04+5:30
पोलिस प्रशासनाने पोलिसांच्या समस्या समजून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच कामाशिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयात येण्यास पोलिस कर्मचार्यांना मनाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या समस्यांसाठी हेल्पलाईन!
अकोला : पोलिस कर्मचारी अनेक समस्या मांडण्यासाठी किंवा प्रशासकीय कामाची चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने पोलिसांच्या समस्या समजून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच कामाशिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयात येण्यास पोलिस कर्मचार्यांना मनाई करण्यात आली आहे.
पोलिस कर्मचार्यांना आपल्या समस्या, प्रशासकीय कामाच्या चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात यावे लागते. पोलिस कर्मचारी कामाची चौकशी करण्यासाठी थेट संबंधित लिपिकाच्या टेबलवर जातात. पोलिस कर्मचार्यांच्या कामाला विलंब झाल्यास, त्यांना लिपिकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, पोलिस कर्मचार्यांचे लिपिकांसोबत वादविवाद होतात. अनुशासन आणि शिस्तीचे धडे देणार्या पोलिसांनीसुद्धा नियमांचे पालन करण्याच्या हेतूनेच पोलिस प्रशासनाच्यावतीने पोलिसांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईन पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे आहे. पोलिसांनी त्यांच्या खासगी कामांसाठी आधी हेल्पलाईनवर संपर्क साधावा. नंतर पोलिस उपअधीक्षक गृह यांच्याकडे समस्या मांडाव्यात. पोलिस कर्मचार्यांनी प्रशासकीय कामाची चौकशी करण्यासाठी कार्यालयातील लिपिकांना भेटू नये. पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये वैयक्तिक काम किंवा काही कारण नसताना पोलिस कर्मचारी आढळून आल्यास त्यांचेवर अनुशासनात्मक कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.
** हेल्पलाईनवर संपर्क साधावा
पोलिस कर्मचार्यांना त्यांच्या प्रशासकीय अडीअडचणी सोडविण्यासाठी 0७२४ २४४५३0५ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर एका कर्मचार्याची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर पोलिस कर्मचार्यांनी संपर्क साधून, आपल्या अडीअडचणी मांडाव्यात.