कोरोनातून पूर्णत: बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये आरोग्यविषयक समस्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 10:23 IST2020-11-06T10:22:48+5:302020-11-06T10:23:57+5:30
Post Covid, Akola News बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनातून पूर्णत: बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये आरोग्यविषयक समस्या!
: दुर्लक्ष ठरू शकते घातक
अकोला: कोरोनातून पूर्णत: बरे झाल्यानंतरही काही रुग्णांना आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. अशा रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे; पण क्वचितच रुग्ण पोस्ट कोविड सेंटरला भेट देत असल्याचे वास्तव आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड-१९ हा आजार सर्वांसाठीच नवीन आहे. त्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोनातून बरी झालेली व्यक्ती पुन्हा आजारी पडत असेल किंवा त्याला विविध आरोग्यविषयक समस्या जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अशा रुग्णांवर योग्य उपचार व्हावा, या अनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयात पोस्ट कोविड वॉर्ड सुरू करण्यात आला आहे; परंतु आतापर्यंत जवळपास २० रुग्णांनीच या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आरोग्यविषयक या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या आजाराची शक्यता नाकारता येत नसल्याचे मतही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. कोरोनातून पूर्णत: बरेे झाला असला, तरी काही लक्षणे आढळताच पोस्ट कोविड रुग्णालयाला भेट देण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
ही जाणवतात लक्षणे
- थकवा येणे
- धाप लागणे
- श्वसनाचा त्रास
- खोकला
पोस्ट कोविड ओपीडी आठवड्यातून तीन दिवस
सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १२० मध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ही ओपीडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, असे आठवड्यातून तीन दिवस सुरू असते.
५० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक
कोरोनातून बरे झालेल्या ५० वर्षांवरील व्यक्तींना काही दिवसांनी आरोग्यविषयक समस्या दिसून येत आहेत. पोस्ट कोविड वॉर्डात आतापर्यंत उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण ५० वर्षांवरील वयोगटातील असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्यविषयक काही समस्या जाणवल्यास सर्वोपचार रुग्णालयातील पोस्ट कोविड सेंटरला भेट देऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. विशेषत: वयोवृद्धांनी कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला.