अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी या गावात तिघेजण महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
पाथर्डी येथील रहिवासी प्रवीण अरुण खिरोडकर, सचिन अरुण खिरोडकर व आशिष अरून खिरोडकर हे तिघे जण त्यांच्या राहत्या घरातून गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून गुरुवारी रात्री छापा टाकून त्यांच्या घरातून वीस हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध तेलारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.