अकोल्यात ७० हजारांचा गुटखा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:20 IST2020-08-25T17:20:37+5:302020-08-25T17:20:47+5:30
७० हजार रुपयांचा गुटखा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा जप्त केला.

अकोल्यात ७० हजारांचा गुटखा साठा जप्त
अकोला : डाबकी रोडवरील जोगळेकर प्लॉट तसेच शिव नगर येथून ७० हजार रुपयांचा गुटखा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा जप्त केला. गुटख्याची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगळेकर प्लॉटमधील भिरड मंगल कार्यालय येथून संजय मदनलाल अग्रवाल ४७ हा गुटख्याची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. यावरून पथकाने छापा टाकून संजय अग्रवाल याच्याकडून ५१ हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला, तसेच यावेळी गुटख्याची खरेदी करणारा रितेश कैलास गवळी रा. वानखडे नगर डाबकी रोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शिव नगरमधील पाण्याच्या टाकीजवळ रहिवासी असलेल्या महेश गोपाल बुंदेले याच्या घरातून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणावरून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.