परीक्षेच्या भीतीने घर सोडलेल्या मुलींचा जीआरपीच्या सतर्कतेने शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 11:13 IST2020-03-04T11:13:48+5:302020-03-04T11:13:54+5:30
त्यांनी सांगितलेली नावे व इतर माहिती खरी आढळल्यावरून रेल्वे पोलिसांनी मुलींना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.

परीक्षेच्या भीतीने घर सोडलेल्या मुलींचा जीआरपीच्या सतर्कतेने शोध
अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुली ९ व्या वर्गाच्या विद्यार्थिनी असून, आता लवकरच त्यांची परीक्षा असल्याने या भीतीपोटी तीनही मुली मंगळवारी दुपारी गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसने अकोला रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या बेतात असताना या मुलींच्या हालचालीवरून जीआरपी पोलिसांनी त्यांची विचारपूस करीत त्यांना बालकल्याण समितीच्या स्वाधीन करण्यात आले.
अकोला जीआरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे रेल्वेस्टेशनवरील गस्तीवर असताना त्यांना तीन मुली संभ्रमावस्थेत फिरत असल्याच्या दिसून आल्या. या तीनही मुलींची हालचाल घाबरलेली तसेच संशयास्पद दिसल्याने साळवे यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले असता, या मुली स्टेशनवरील प्रवाश्यांना महाराष्ट्र एक्सप्रेससह आणखी काही रेल्वेची माहिती घेताना दिसल्या. याबाबत किरण साळवे यांनी तीनही मुली असल्याने महिला कर्मचारी सरोदे, माहुरे, मोरे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक मोजे, हवालदार घ्यारे पाटील व देशमुख यांना बोलावून घेतले. तीनही मुलींची चौकशी व विचारपूस केल्यानंतर नवव्या वर्गाच्या परीक्षेची भीती तसेच घरी रागावल्यामुळे मुंबई येथे जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी सांगितलेली नावे व इतर माहिती खरी आढळल्यावरून रेल्वे पोलिसांनी मुलींना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.
रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावत असताना तीन मुली संभ्रमाव्यस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांची विचारपूस केली असता, परीक्षेची भीती तसेच रागाच्या भरात ते घर सोडून जात असल्याचे कळले. त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले असून, त्यांचे पालक येईपर्यंत त्यांना सुधारगृहात ठेवण्यात येईल.
- किरण साळवे, सहायक पोलीस निरीक्षक, जीआरपीएफ, अकोला.