दोन महिन्यांपासून धान्यच मिळाले नाही
By Admin | Updated: June 3, 2014 20:53 IST2014-06-03T19:17:57+5:302014-06-03T20:53:30+5:30
मूर्तिजापूर : प्रत्येक गरिबाची अन्नाची गरज भागावी, या उदात्त हेतूने शासनाने शिधापत्रिकेद्वारे सरकारी स्वस्त दुकानांमार्फत धान्य पुरवठा करण्याची योजना अनेक वर्षांपासून सुरू केली आहे. मात्र पुरवठा विभाग व सरकारी स्वस्त धान्य दुकानदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गत दोन महिन्यांपासून तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्यच मिळाले नाही. परिणामी पात्र लाभार्थींवर उपासमारीची पाळी आली आहे.

दोन महिन्यांपासून धान्यच मिळाले नाही
मूर्तिजापूर : पुरवठा विभाग व सरकारी स्वस्त धान्य दुकानदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गत दोन महिन्यांपासून तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्यच मिळाले नाही. परिणामी पात्र लाभार्थींवर उपासमारीची पाळी आली आहे. अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. शासन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी अडीच रुपये किलो दराने ३० किलो गहू व तांदूळ पुरविते. तसेच जानेवारी २०१४ पासून गरीब व पात्र कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेत सामील करून त्यांना २ रु. किलो दराने गहू व ३ रु. किलो दराने तांदूळ वितरित करण्यात येत आहेत.असे असले तरी गत दोन महिन्यांपासून बीपीएल व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना धान्यच मिळाले नाही. गत तीन महिन्यांपूर्वी तालुका धान्य पुरवठा विभागामार्फत एपीएल कार्डधारकांसाठी शासनाकडून धान्य उपलब्ध नसताना अनावधानाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून चालान भरण्यात आले होते व त्यांना धान्यही वितरित करण्यात आले होते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास येताच तालुक्यातील सर्व शासकीय दुकानदारांकडून धान्य लगेच परत मागण्यात आले; परंतु धान्य दुकानदारांनी चालानपोटी भरलेली रक्कम त्यांना परत देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढला. परिणामी त्यांनी त्यानंतरच्या मालासाठी चालानच भरले नाही. त्यामुळे बीपीएल व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रभारी तहसीलदार पी. के. देशमुख यांनी काही अडचणींमुळे गत दोन महिन्यांचे धान्य वितरित करता आले नसल्याचे मान्य करून येत्या दोन-तीन दिवसामध्येच दोन महिन्याचे धान्य वितरित केले जाईल असे सांगीतले.