तीन महिन्यात पेन्शनवाढ द्या; अन्यथा १ मार्चपासून आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 18:45 IST2020-11-16T18:41:01+5:302020-11-16T18:45:23+5:30
भविष्य निर्वाह निधी संगठन कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर घंटानाद करण्यात आला.

तीन महिन्यात पेन्शनवाढ द्या; अन्यथा १ मार्चपासून आंदोलन!
अकोला: ईपीएस पेन्शनधारकांना तीन महिन्यांमध्ये समाधानकारक पेन्शनवाढ द्या, अन्यथा १ मार्च २०२१ पासून चले जाओ चळवळ सुरू करू, असा इशारा ईपीएस ९५ पेन्शनधारक संघर्ष समितीचे अध्यक्ष देवराव पाटील यांनी दिला आहे. या मागणीसाठी भविष्य निर्वाह निधी संगठन कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर घंटानाद करण्यात आला. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात ज्यांनी आयुष्यभर मेहनत केली त्यांनाच म्हातारपणी अल्प पेन्शन देऊन त्यांची अवहेलना शासन करत असल्याचा आरोप आंदोलनावेळी संघटनेतर्फे करण्यात आला. मागील सहा वर्षात सातत्याने कृषी, शिक्षण, आरोग्यावर पूर्ण दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून कष्टकऱ्यांचे जीवन जगणे कठीण करण्यात आल्याचा आरोप यावेळी ईपीएस पेन्शनधारकांकडून करण्यात आला. शासनाच्या या धोरणा विरोधात ईपीएस ९५ पेन्शनधारक संघर्ष समितीतर्फे सोमवारी भविष्य निर्वाह निधी संगठन कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी धर्मराज सरोदे, श्रीनिवास गणगणे, विश्वनाथ हिवराळे, सुभाष राठोड, रामराव पाटेखेडे, सुरेश लांडे आदी पदाधिकाऱ्यांसह इतर सदस्यांची उपस्थिती होती. संचालन नयन गायकवाड यांनी, तर आभार अवचार यांनी मानले. या प्रसंगी संघर्ष समितीतर्फे भविष्य निर्वाह निधी संगठन आयुक्त यांच्या मार्फत पंतप्रधान, अर्थमंत्री, कामगारमंत्री यांना निवेदन देण्यात आले.