आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा!
By Admin | Updated: May 23, 2017 01:25 IST2017-05-23T01:25:47+5:302017-05-23T01:25:47+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा

आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे उपस्थित होते. मान्सून काळात जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्ती आणि मान्सूनपूर्व तयारीच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. मान्सून काळात आपत्तीच्या घटनेत मदत पोहोचविण्यासाठी तातडीने संवाद होणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘बीएसएनएल’ ने यंत्रणा सज्ज ठेवून, पर्यायी व्यवस्थादेखील करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते नादुरुस्त झाल्यास वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांचे नियोजन करून, तहसीलस्तरावरील शोध व बचाव कार्याच्या साहित्याची तहसीलदारांनी खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय योनी दिले. पोलीस विभागाने यंत्रणा सज्ज ठेवण्याचे सांगत, मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले. अग्निशमन दल दल, एनसीसी, एनएसएस विभागाने मदत कार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. तसेच संबंधित विभागांनी परस्परांसोबत समन्वय ठेवून मदत व बचाव कार्याच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील तहसीलदार, पोलीस, आरोग्य विभागासह अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते.
विस्फोटक साठे, सिलिंडरचे गोदाम, कारखान्यांची तपासणी करा!
जिल्ह्यातील जिलेटीनसारख्या विस्फोटकांचे साठे, फटाक्यांचे साठे, गॅस सिलिंडरचे गोदाम आणि रासायनिक खत कारखान्यांची तपासणी करून, सुरक्षासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी जिल्ह्यातील तहसीलदार व पोलीस विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. मानवनिर्मित घडणाऱ्या आपत्तीच्या घटनांबाबत सतर्क राहून, अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामध्ये विहीर व इतर कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनसारखे विस्फोटकांचे साठे, त्याची होणारी वाहतूक यासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी संयुक्त तपासणी करण्याचे सांगत, एलपीजी गॅस भरण्याची केंद्र, गॅस सिलिंडरचे गोदाम, ज्वलनशील व रासानिक पदार्थांचा वापर करणारे कारखाने आणि फटाक्याचे साठे इत्यादींची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तपासणीमध्ये संबंधित ठिकाणी प्रमाणित आदर्श कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात येते की नाही, तसेच सुरक्षेसाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, यासंदर्भात सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातील सर्वच गोदामांची तपासणी करून गोदामांमध्ये प्रत्यक्ष कोणत्या मालाची साठवणूक करण्यात आली आहे, याबाबतची माहिती घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पर्यटनाला गेलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ‘अॅप’!
पर्यटन व अन्य कारणांसाठी राज्याबाहेर गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांवर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट कोसळल्यास त्यांच्या मदतीसाठी ‘अॅप’ निर्मितीची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. या ‘अॅप’वर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांचे नाव व मोबाइल क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.