शिक्षणासंबंधी तक्रारी करा आता ऑनलाईन !
By Admin | Updated: December 25, 2014 23:41 IST2014-12-25T23:41:59+5:302014-12-25T23:41:59+5:30
शिक्षण विभागाचा उपक्रम.

शिक्षणासंबंधी तक्रारी करा आता ऑनलाईन !
अकोला : शाळांच्या संदर्भात पालकांच्या विविध तक्रारी असतात परंतु या तक्रारी कुठे कराव्या याची माहिती नसते. त्यामुळेच पालकांना तक्रार करणे सोपे जावे, यासाठी आता ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. येत्या एक महिन्यात ही यंत्रणा उभी केली जाणार आहे.
शाळांकडून मनमानी पद्धतीने केली जाणारी शुल्कवाढ, शाळेत प्रवेश देण्यासाठी मागितली जाणारी कागदपत्रे, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देताना केली जाणारी टाळाटाळ यासह शिक्षण विभागाशी संबंधित अनेक तक्रारी पालकांच्या असतात. शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून बेकायदेशीरपणे शुल्कवाढ केली जाते. त्यामुळे पालकांची पिळवणूक होते. शुल्क भरले नाही तर मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांंच्या मुलाखती घेता येत नाहीत. तसेच कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांंकडे आधारकार्ड, आरोग्य प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची सक्ती करता येत नाही. त्यासाठी शाळा प्रशासनाकडून पालकांवर दबाव आणला जातो. त्यातच अलीकडच्या काळात शाळांमध्ये स्कूलबस चालक व वाहकाकडून बालकांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटना टाळण्यासाठी एखाद्या शाळेकडून योग्य पाऊले उचलले जात नसेल तर कोणाशी संपर्क साधावा, यासंदर्भात पालकांना कोणतीही माहिती नसते.
शिक्षणविषयक तक्रारी नोंदविण्यासाठी शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक दिलेले नाहीत. महापालिका, जिल्हा परिषद तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्या शाळा येतात याची देखील माहिती नसते. याची माहिती देणारी यंत्रणा देखील उभी केली जाणार आहे. सोबतच शिक्षक विषयक तक्रारींसाठी ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. येत्या एक महिन्यात ही यंत्रणा उभी केली जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील तक्रारी संदर्भात पालकांना तक्रार करणे सोपे जावे यासाठी लवकरच ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे. यामुळे शिक्षण विभागातील तक्रारींचा निपटारा करणे सोपे जाईल, असे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.