शुद्ध पाण्यासाठी घागर मोर्चा
By Admin | Updated: May 30, 2017 01:51 IST2017-05-30T01:51:35+5:302017-05-30T01:51:35+5:30
मलकापूरवासी आक्रमक : मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मोर्चा

शुद्ध पाण्यासाठी घागर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या हद्दवाढीनंतर अकोला शहरात समाविष्ट झालेल्या मलकापूर परिसरातील हजारो नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात महान धरणातून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी सोमवारी घागर मोर्चा काढला.
जवळपास पंचवीस हजारावर लोकवस्ती असलेल्या या परिसरात पाणीटंचाईसोबतच दूषित पाणीपुरवठा होत आहे. हद्दवाढीपूर्वी अस्तित्वात असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतने पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी थकविल्याने अकोला योजनेवरील पाणीपुरवठा बंद केला होता. आता मलकापूर परिसर हा अकोल्यात समाविष्ट झाला आहे त्यामुळे महानगरपालिकेने शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, अशी रास्त मागणी घेऊन नगरसेवक मंगेश काळे यांनी मलकापूर परिसरातील महिलांसह घागर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये अनेक महिलांनी बॉटलमध्ये दूषित पाणी आणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मलकापूर परिसराला महान धरणातून पाणीपुरवठा करणे, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आदी मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले.