निधी वाटप; भाजपाची राष्ट्रवादीवर मेहरबानी
By Admin | Updated: June 17, 2017 01:09 IST2017-06-17T01:09:27+5:302017-06-17T01:09:27+5:30
महापालिकेत रंगणार भाजपा विरुद्ध शिवसेना, काँग्रेसचा सामना

निधी वाटप; भाजपाची राष्ट्रवादीवर मेहरबानी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मनपाला प्राप्त ७ कोटी ७० लक्ष रुपयांच्या निधीवरून पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्ष शिवसेना, काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये सामना रंगण्याची चिन्हे आहेत. निधी वाटपात भाजपाने विरोधी बाकांवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिल्याची बाब इतर राजकीय पक्षांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, हा दुजाभाव का, असा सवाल उपस्थित करून शिवसेना व काँग्रेसने सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याचा गर्भित इशारा दिला आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाला शासनाकडून दलितेतर वस्ती योजनेंतर्गत ४ कोटी रुपये व नगरोत्थान योजनेंतर्गत ३ कोटी ७० लक्ष असा एकूण सात कोटी ७० लाख रुपये निधी प्राप्त झाला. या निधीची २०१७-१८ चालू आर्थिक वर्षात तरतूद करावयाची असून रस्ते, नाल्या व आवश्यक असणाऱ्या कामांचा त्यामध्ये समावेश राहील. मनपाच्या सभागृहात ८० नगरसेवकांपैकी भाजपाचे संख्याबळ ४९ असून, काँग्रेसचे १३ तर राष्ट्रवादीची लोकशाही आघाडी व शिवसेनेच्या आघाडीचे संख्याबळ प्रत्येकी नऊ आहे. महापौर विजय अग्रवाल यांच्या सूचनेनुसार निधी वाटपाची यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रत्येकी ११ लक्ष रुपये निधी वाटप करण्यात आला असून, काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसंच्या नगरसेवकांना केवळ साडेपाच लाख रुपये देण्याची शिफारस करण्यात आली आहे. भाजपाने तयार केलेली यादी शुक्रवारी समोर येताच शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकली. संपूर्ण शहरात विकास कामे करायची असतील तर भाजपाने निधी वाटपातील दुजाभाव बंद करावा, अन्यथा सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा सेना व काँग्रेसने दिला आहे. यासंदर्भात महापौर अग्रवाल यांना संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
एक नजर पदाधिकाऱ्यांच्या निधीवर
महापौर विजय अग्रवाल- ५० लक्ष (दलितेतर निधी), ५० लक्ष (नगरोत्थान निधी)
उपमहापौर वैशाली शेळके- १५ लक्ष, १६ लक्ष
सभापती बाळ टाले- १५ लक्ष, १६ लक्ष
सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार- १० लक्ष, ११ लक्ष
गटनेता राहुल देशमुख- १० लक्ष, ११ लक्ष
काँग्रेसची आयुक्तांकडे धाव
शहरातील विकास कामांसाठी शासनाने निधी दिला. त्या निधीतून सर्वच नगरसेवकांच्या प्रभागात कामे होणे अपेक्षित असल्याचे सांगत विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांची भेट घेतली. निधी वाटपाच्या मुद्यावर प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याची विनंती साजिद खान यांनी केली.
सत्ताधारी भाजपाने तयार केलेली निधी वाटपाची यादी पाहता ‘सबका साथ, सबका विकास’ हे थोतांड असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या निधीवर सर्वांचा समान अधिकार आहे. भाजपाचे खासदार,आमदारांसह पालकमंत्र्यांनी या विषयात लक्ष दिल्यास नगरसेवकांना न्याय मिळेल, ही अपेक्षा आहे.
- राजेश मिश्रा, गटनेता शिवसेना
शासनाच्या निधीतून दर्जेदार विकास कामे होणे गरजेचे आहे. त्यावर आमचा कटाक्ष आहे. निधी वाटपाचा निर्णय सभागृहाला घ्यायचा असून, तो योग्यरीत्या घेण्यात यावा.
- अजय लहाने, आयुक्त, मनपा