इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली फसवणूक!

By Admin | Updated: May 31, 2017 01:43 IST2017-05-31T01:43:02+5:302017-05-31T01:43:02+5:30

अकोला: इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून प्रत्येकी १0७0 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊन बनावट पावती देणाऱ्या दोघांना जुने शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

Fraud under the name of electric meter! | इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली फसवणूक!

इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली फसवणूक!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून प्रत्येकी १0७0 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊन बनावट पावती देणाऱ्या दोघांना जुने शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दोन वर्षांपूर्वी जुने शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध १७ जणांनी इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकसुद्धा केली होती; परंतु या प्रकरणात इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीला वीज वितरण कंपनीच्या बनावट पावत्या बनवून देणारे योगेश ढवळे व सुरेश खेते हे दोघे दोन वर्षांपासून फरार होते. इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे घेणारे किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे सांगून हजारो रुपये उकळणाऱ्या टोळीला ढवळे व खेते बनावट पावत्या देत होते. या पावत्या नागरीकांना देऊन त्यांच्याकडून ही टोळी पैसे घेत होती. त्यासाठी ढवळे व खेतेलासुद्धा एका पावतीमागे २00 ते ३00 रुपये मिळत होते.
योगेश ढवळे व सुरेश खेते अकोल्यात आल्याची माहिती जुने शहरचे ठाणेदार भाऊराव घुगे व पथकाला मिळाली. पोलिसांनी त्यांच्या घरी छापा घालून त्यांना अटक केली. दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपींकडून बनावट पावत्या जप्त करायच्या आहेत असे सांगत, आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोघांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Fraud under the name of electric meter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.