लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांमध्येच काही अभिकर्ता संस्था आणि व्यापाऱ्यांनी हातमिळवणी करून मोठा गैरप्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोला जिल्ह्यातील सात ज्वारी खरेदी केंद्रांवर तब्बल ५,३८३ क्विंटल ज्वारीची खरेदी १९३ शेतकऱ्यांच्या नावावर खोटी दाखवण्यात आली असून, त्याद्वारे १.८१ कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.
जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, खरीप हंगाम २०२४-२५ दरम्यान जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांपैकी सात केंद्रांत हा प्रकार घडला आहे. 'बीम' पोर्टलवर नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची सात-बारा उताऱ्यांमध्ये बदल करून त्यांच्या नावे ज्वारीची खरेदी दाखवण्यात आली. प्रत्यक्षात ही ज्वारी व्यापाऱ्यांकडून आणून शासकीय खरेदी केंद्रांवर दाखवण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. या गैरप्रकारात सहभागी संत नरसिंह महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी (मुंडगाव), वक्रतुंड एफपीओ (तेल्हारा), अकोला व बार्शिटाकळी तालुका विक्री संघ, ऑर्गेनिक एफपीओ (कवठा) आणि बाप्पा मोरेश एफपीओ (कान्हेरी गवळी) आदी संस्थांची नावे आढळली आहेत. समन्वय समितीच्या अहवालावरून जिल्हाधिकारी डॉ. वर्षा मीना यांनी तत्काळ कारवाईचा आदेश दिला आहे. शासकीय योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक सहन केली जाणार नाही. जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांवर वेगवेगळी कारवाई
आदेशानुसार, संत नरसिंह महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनीला पाच वर्षांसाठी सर्व खरेदी कामातून वगळण्यात आले आहे, तर उर्वरित सहा संस्थांवर प्रत्येकी १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचा कमिशन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी एका कंपनीवर एक तर इतर कंपन्यांवर वेगळी कारवाई करण्याचा प्रकार घडला आहे.
Web Summary : A ₹1.81 crore jowar purchase scam has been exposed in Akola, involving false purchases under farmers' names. Seven purchase centers are implicated. Action has been taken against involved companies.
Web Summary : अकोला में ₹1.81 करोड़ का ज्वार खरीद घोटाला उजागर हुआ है, जिसमें किसानों के नाम पर झूठी खरीद शामिल है। सात खरीद केंद्र शामिल हैं। शामिल कंपनियों के खिलाफ कार्रवाई की गई है।