सराईत गुन्हेगाराच्या हत्येप्रकरणी चौघे ताब्यात
By Admin | Updated: December 11, 2014 00:53 IST2014-12-11T00:53:33+5:302014-12-11T00:53:33+5:30
किरकोळ वादातून मारहाण केल्याची कबुली.
_ns.jpg)
सराईत गुन्हेगाराच्या हत्येप्रकरणी चौघे ताब्यात
अकोला : जुने शहरात राहणारा सराईत गुन्हेगार रऊफ खान सलीम खाम (४२) हा मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धाबेकर फार्म हाऊसजवळील लोणी रोडवरील शेतामध्ये जखमी अवस्थेमध्ये दिसून आला. त्याला पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयामध्ये भरती केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनीही किरकोळ वादातून त्याला मारहाण केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
जुने शहरात राहणारा रऊफ खान याची पोलीस दफ्तरी निगरानी बदमाश म्हणून नोंद आहे. पैसे मागण्यासाठी तो अनेकांशी किरकोळ वाद घालायचा. पैसे दिले नाहीतर स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून इजा पोहोचवायचा. त्यामुळे अनेकजण त्याच्याशी वाद न घालता, त्याला पैसे द्यायचे. पोलीस ठाण्यामधील कर्मचार्यांनासुद्धा पैसे मागायचा. सोमवारी रऊफ खान हा पोळा चौकातील जयस्वाल देशी दारूच्या दुकानावर दारू पिण्यासाठी गेला होता. त्याचा रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास दुकानातील कर्मचार्यांसोबत वाद झाला. त्यामुळे दुकानातील सागर डोंगरे, कुंदन पटेल, कृष्णा वाडेकर आणि नटवरलाल नामक कर्मचार्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रऊफ जखमी झाला. चारही कर्मचार्यांनी त्याला उचलून धाबेकर फार्म हाऊसजवळील लोणी रोडवरील एका शेतामध्ये सोडून दिले आणि हे कर्मचारी तेथून पसार झाले. मंगळवारी सकाळी ही घटना नागरिकांना कळली. त्यांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून जखमी अवस्थेतील रऊफ खान यास सर्वोपचार रुग्णालयात भरती केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रऊफ याची पत्नी व मुलाने पोलिसांनी रऊफला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणी जयस्वाल दुकानावरील चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी रऊफला मारहाण केल्याची कबुली दिली.