क्षमा करण्यातच जीवनाचे मर्म : अघमकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:27+5:302021-04-03T04:15:27+5:30

अकोला : प्रभू येशू यांनी जगाला क्षमा, प्रेम, त्याग, बंधुभाव यांची शिकवण दिली. त्या शिकवणीचे आचरण करून एकमेकांना ...

Forgiveness is the essence of life: Aghamkar | क्षमा करण्यातच जीवनाचे मर्म : अघमकर

क्षमा करण्यातच जीवनाचे मर्म : अघमकर

अकोला : प्रभू येशू यांनी जगाला क्षमा, प्रेम, त्याग, बंधुभाव यांची शिकवण दिली. त्या शिकवणीचे आचरण करून एकमेकांना क्षमा करण्यातच जीवनाचे खरे मर्म असल्याचे रेव्हरंड नीलेश अघमकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात गुडफ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवारचा सण शुक्रवार, २ एप्रिल रोजी ख्रिश्चन धर्मिय बंधू-भगिनींनी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत हा सण साजरा करण्यात आला. शहरातील आठ चर्चेससह जिल्ह्यातील सुमारे तीस चर्चेसमधून आणि आपापल्या निवासस्थानांमधून धर्मगुरूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ख्रिश्चन बंधू-भगिनींसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

काही चर्चेसमधून कोरोना नियमांचे पालन करीत तर शंभराहून अधिक सदस्य असलेल्या चर्चच्या सदस्यांसोबत धर्मगुरू यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील वचनांचा आधार घेत प्रभू येशू ख्रिस्तांच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या घटनेवर प्रकाश टाकला. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेविअर्स अलायन्स चर्चचे रेव्हरंड नीलेश अघमकर तसेच वैशाली डोंगरदिवे, राजेश ठाकूर, अमित ठाकूर, मीना बिरपॉल, मीनाक्षी वर्मा, सुवार्ता ढिलपे यांनी प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर खिळलेल्या अवस्थेत असताना उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलच्या वचनांच्या आधारे भाष्य केले. यावेळी ख्रिश्चन बंधू-भगिनी यांनी गुडफ्रायडेनिमित्त विविध गीतेही सादर केली.

गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा लेन्थचा पवित्र महिना सुरू होता. या काळात ख्रिश्चन बंधू, भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअरचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोरोनामुळे या कॉटेज प्रेअर्स रद्द करण्यात आल्या. सर्वांनी चाळीस दिवस आपापल्या घरांमध्येच प्रार्थना केल्या. कोरोना विषाणूच्या संकटातून केवळ राज्य आणि देशच नव्हे, तर संपूर्ण जगाची सुटका व्हावी, यासाठी परमेश्वराकडे याचना व प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, रविवारी प्रभू येशूंच्या पुनरूत्थानानिमित्त ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रात:कालीन प्रार्थना आणि सकाळी ९ वाजता प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे, दरवर्षी निघणारी दिंडी मात्र रद्द करण्यात आली आहे. रविवारीही काही धर्मगुरू आपापल्या निवासस्थानी प्रार्थनासभा घेतील, त्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती सदर चर्चेसच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी दिली.

Web Title: Forgiveness is the essence of life: Aghamkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.