पीक संरक्षणासाठी वनविभागाचे प्रात्यक्षिक
By Admin | Updated: August 6, 2014 01:04 IST2014-08-06T01:04:37+5:302014-08-06T01:04:37+5:30
शेतांमधील पिकांच्या होत असलेल्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.

पीक संरक्षणासाठी वनविभागाचे प्रात्यक्षिक
सायखेड: परिसरात वन्यप्राण्यांपासून शेतकर्यांच्या शेतांमधील पिकांच्या होत असलेल्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. यादृष्टीने ४ ऑगस्ट रोजी परिसरातील धाबा येथील एका शेतकर्याच्या शेतात अरुणाचल प्रदेशातील वन्यप्राणी विशेषज्ज्ञ व वन्यजीव चिकित्सक डॉ. रुद्रा यांनी पीक संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून राबविण्याच्या उपक्रमाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. धाबा येथील शेतकरी जालिंदर हातोले यांच्या शेतात सदर प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी डॉ. रुद्रा यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले. वन्यप्राण्यांना पिकांच्या शेतापासून दूर रोखण्यासाठी सुकलेली मिरची गायी-म्हशीच्या शेणात मिसळून त्याच्या गोवर्या कशा बनवाव्या, याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी या प्रयोगाची माहिती देताना त्यांनी शेतात वन्यप्राणी येतात अशा जागी सदर गोवर्यांचा धूर करावा, तसेच बोंद्रीच्या किंवा खादीच्या पोत्याच्या तीन कप्प्यात लाल मिरची गुंडाळून ती काठीला गुंडाळून काठीला बांधावी व त्याचा टेंभा करून तो धूर हवेत सोडावा. गाडीच्या इंजीनमधील ग्रीस व ऑईल सदर पोत्यावर ब्रशने घट्ट लावावे व त्यावर मिरची पावडर टाकून ते घड्या मारून बंद करावे. यानंतर वन्यप्राणी शेतात येण्याच्या वेळी संभाव्य ठिकाणी तारांच्या कुंपणास किंवा दोन काठय़ांना बांधावे. या वासामुळे व मिरचीच्या धुरामुळे वन्यप्राणी शेतात येत नसल्याचे डॉ. रुद्रा यांनी सांगितले. डॉ. रुद्रा यांनी या पीक संरक्षण उपक्रमाचे प्रात्यक्षिक महाराष्ट्रात १७७ ठिकाणी करून दाखविले आहे. ते मागील २४ वर्षांंपासून या उपक्रमाचा प्रसार करीत आहेत. धाबा येथील या प्रात्यक्षिकाच्या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) एम.डी. चव्हाण, बाश्रीटाकळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम. सुरजुसे,धाबाचे वनक्षेत्र सहायक यू.एम.चोरे, लोहगडचे मोहन भोसले, अकोलाचे कातखेडे,आकोटचे वनपाल, लाड, मूर्तिजापूरचे घुगे, वनरक्षक रश्मी भुजाडे, वैशाली कोहर, हरणे, एन.वाय. गवळी, एम.बी. देवकते, एस.आर. भिसे, एस.बी. नप्ते, सोनोने, वनकर्मचारी प्रभाकर पाटील, गणेश निमकंडे, लोखंडे, अनंता काकड, तसेच शेतकरी कैलास पाटील, गजानन पाटील, उमेश करवले, बबन इंगळे, समाधान चांभारे, भारत गालट, देविदास हातोले, हिंमत करवते, पुरुषोत्तम दहात्रे, संजय भारसाकळे, गजानन उंडाळ व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.