लोकनृत्य, संस्कृती, परंपरा जपण्याची तरुणाईची धडपड

By Admin | Updated: September 19, 2014 02:17 IST2014-09-19T02:17:13+5:302014-09-19T02:17:13+5:30

युवा महोत्सवात तरुणांचे समाजसुधारणेला प्राधान्य, चित्रपटातील गाण्यांचा नामोल्लेखही नाही.

Folk dance, culture and tradition of youth tradition | लोकनृत्य, संस्कृती, परंपरा जपण्याची तरुणाईची धडपड

लोकनृत्य, संस्कृती, परंपरा जपण्याची तरुणाईची धडपड

विवेक चांदूरकर /अकोला
तरुण म्हटले की धांगडधिंगा, महाविद्यालयातील गॅदरिंग, कार्यक्रमात पॉप संगीत किंवा हिंदी चित्रपटातील गाजलेली ह्यचिकनी चमेलीह्ण, ह्यआता माझी सटकलीह्ण अशी त्या- त्या वर्षात गाजत असलेल्या गाण्यांवरील नृत्य, हेच चित्र आपल्याला दिसते. मात्र, यावर्षीचा युवा महोत्सव या सर्वाला अपवाद ठरत आहे. या महोत्सवात सादर होत असलेले नाटक, एकांकिका, लोकनृत्य यामधून आपली लोप पावत असलेली लोककला, ग्रामीण भागातील पारंपरिक नृत्यांचे प्रतिबिंब उमटले. समाजजागृतीवर भर देत आपली संस्कृतीची जपवणूक करण्याचाच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला तरुण श्रोत्यांकडून मिळत असलेली टाळ्यांची साद अजूनही या परंपरेची आवड व आकर्षण कायम असल्याचे दाखवत होती.
शिवाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव सध्या सुरू आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी महाविद्यालय परिसरातील स्व. डॅडी देशमुख खुला रंगमंच, वसंत सभागृह, मराठा मंडळ मंगल कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लोकनृत्यामध्ये गोंडी संस्कृती, बंजारा समाजातील तीज महोत्सव, राजस्थानी नृत्य तरुणांनी सादर केले. हे नृत्य सादर करीत असताना त्यासोबतची गाणी विद्यार्थ्यांनी स्वत: गायिली आणि तेही गोंडी, बंजारा व राजस्थानी भाषेमधून. त्यामुळे महोत्सवात एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले.
एकविसावी सदी असेल, फेसबुक व्हॉट्स अँपचा वापर असेल, पॉप संगीत, पाश्‍चात्त्य चित्रपटांचा भडीमार होत असेल मात्र, आपले तरुण अजूनही शाबूत आहेत व ते आपली संस्कृती, परंपरेलाच प्राधान्य देत असल्याचे युवा महोत्सवातून निदर्शनास आले. चित्रपटांच्या गीतावर, पॉप संगीतावर ही तरुणाई थिरकली नसून, आपली बोली भाषा, लोककला, संस्कृती, पारंपरिक सण, नृत्य जपण्याकरिता, त्याचा प्रचार-प्रसार करण्याचीच धडपड तरुणांमध्ये दिसत होती.

Web Title: Folk dance, culture and tradition of youth tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.