सट्टा बाजारात चढ-उतार!
By Admin | Updated: October 18, 2014 00:55 IST2014-10-18T00:55:39+5:302014-10-18T00:55:39+5:30
आता कार्यकर्ते मताधिक्याचे आडाखे बांधण्यात मग्न; अकोला पूर्वमधील उमेदवारांना सर्वात कमी भाव

सट्टा बाजारात चढ-उतार!
अकोला: विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री १५ ऑक्टोबरनंतर शांत झाली असून, आता कार्यकर्ते मताधिक्याचे आडाखे बांधण्यात मग्न आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेमोडीतून मिळणार्या दिलाशामुळेच प्रमुख उमेदवारांमध्ये विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या बहुरंगी लढतींमुळे निकालाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नसून, सट्टा बाजारातील भावांमध्ये चढ-उतार होत आहे.
शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीमधील घटस्फोट, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीत झालेली बिघाडी, भारिप-बहुजन महासंघाने राबविलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आदींमुळे जिल्हयातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, मूर्तिजापूर आणि बाळापूर या पाचही मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली. परिणामी, निकालांचे आडाखे बांधण्यात मतदार, कार्यकर्ते, तथा राजकीय जाणकारांसह सटोडियेही गोंधळात असल्याचेच पाहवयास मिळत आहे. सट्टा बाजार आणि विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात सर्वात जास्त जागांवर भाजप उमेदवार विजयी होणार आहेत.
*नेमके काय सुरू आहे सट्टाबाजारात
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम आणि अकोला पूर्वमधील उमेदवारांना सर्वात कमी भाव दिला जात आहे. भाव कमी असलेल्या उमेदवारांची विजयाची खात्री सर्वाधिक असते. अकोला पश्चिममधील भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा यांना बुधवारी १३ पैसे भाव दिल्या गेला. मात्र गुरुवारी १५ पैसे आणि शुक्रवारी २५ पैसे भाव दिल्या गेला.
*विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघातही चौरंगी लढत झाली. या मतदारसंघात बुधवारी भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर आणि भारिप-बमंसचे हरिदास भदे यांना प्रत्येकी ९0 पैसे भाव दिल्या गेला. मात्र शुक्रवारी भदे यांना ९३ तर सावरकर यांच्यावर ८0 पैसे भाव लावण्यात आला.