लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशांतर्गत कृषी कृषी संशोधकांच्या अथक परिश्रमातून शेतीची उत्पादकता निश्चितच वाढली आहे. यामागे शेतकऱ्यांचे श्रमही तेवढेच मोलाचे आहेत. शेतकऱ्यांनी आता गावपातळीवरच शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारल्यास त्यातून रोजगावर निर्मिती होऊन आर्थिक, सामाजिक विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने येथील डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून कुलगुरू बोलत होते. मेळाव्याला विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, प्रगतशील शेतकरी बाबाराव जाणकार व अमोल मडोकार यांची उपस्थिती होती.कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले, देशांतर्गत कृषी विद्यापीठांच्या भरीव योगदानाने शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल दृष्टिपथात येत कधीकाळी शेतमाल आयात करणारे राष्ट्र आज निर्यातदारांच्या यादीत अग्रक्रमाकडे वाटचाल करीत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तथा उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचे औचित्य साधत विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सहयोगाने आयोजित अतिशय महत्त्वाकांक्षी पूर्वहंगामी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी अभियानाच्या जनजागृती पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी या अभियानात कृषी विद्यापीठ संपूर्ण शक्तीने उतरले आहे. डॉ. इंगोले यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक रचना कशी ठेवावी, तसेच मृद व जलसंधारणाच्या कामावर भर देण्याचा सल्ला दिल्ला. याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी प्रगतशील कास्तकार बाबाराव जाणकार आणि युवा शेतकरी अमोल माडोकार यांची उपस्थिती होती. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तांत्रिक सत्रात आधुनिक शेती व्यवस्थापनाचे तंत्र उपस्थितांना अवगत करीत त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंकासमाधान केले. यामध्ये प्रामुख्याने जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले, हवामानशास्त्र विभागाचे डॉ. अरविंद तुपे, कापूस विभागाचे डॉ. ताराचंद राठोड, तेलबिया विभागाचे डॉ. एकनाथ वैद्य, कडधान्य विभागाचे डॉ. ए. एन. पाटील, ज्वारी संशोधन विभागाचे डॉ. आर. बी. घोराडे, सोयाबीन विभागाचे डॉ. अनिल ठाकरे, उद्यानविद्या विभागाचे डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. श्याम घावडे, कृषी शक्ती अवजारे विभागाचे डॉ. शैलेश ठाकरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवचरण ठाकरे, वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे डॉ. श्यामसुंदर माने, तणनियंत्रण विभागाचे डॉ. जे. पी. देशमुख, मृदा शास्त्रज्ञ डॉ. विलास खर्चे, कृषी प्रक्रिया विभागाचे प्रा. राजेश मुरूमकार यांचा समावेश होता. याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी बाबाराव जाणकार आणि युवा शेतकरी अमोल माडोकार यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात जवळपास अडीच लाख रुपयांची उलाढाल या मेळाव्यात झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी केले.
कृषी प्रक्रिया उद्योगातून आर्थिक, सामाजिक विकास - कुलगुरू
By admin | Updated: May 26, 2017 02:58 IST