अखेर कृषी विद्यापीठालगतच्या बंधार्यांचा प्रस्ताव पाठवला!
By Admin | Updated: November 21, 2014 02:10 IST2014-11-21T02:10:15+5:302014-11-21T02:10:15+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे दुर्लक्ष

अखेर कृषी विद्यापीठालगतच्या बंधार्यांचा प्रस्ताव पाठवला!
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सतत दुर्लक्ष केल्याने या विद्यापीठालगत नाल्यावर बंधारा बांधण्याचा प्रस्ताव अखेर जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे पाठविला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्राला लागून तीन नदी वजा नाले आहेत. या नाल्यांतून दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. हे पाणी वाहून जाण्याच्या मार्गात रेल्वेचा मोठा पूल असून, अनेक वेळा पूरस्थिती निर्माण होते. त्यावर उपाययोजना म्हणून अकोला-पळसो मार्गावर यावलखेड येथेही पूल बांधण्यात आला आहे. गुडधी-बोंदरखेड-सिसा या गाडवाटेच्या मार्गावर तीन नाल्यांचा संगम असून, या नाल्याचे पात्र पावसाळ्य़ात नदीप्रमाणे वाहते. त्यामुळे या ठिकाणी बंधारा बांधल्यास भूगर्भातील पाणी वाढेल आणि कृषी विद्यापीठालादेखील त्याचा वापर करता येईल, हा उद्देश डोळ्य़ासमोर ठेवण्यात आला होता. हेच पाणी अडवून कृषी विद्यापीठालगत बंधारा बांधण्याचा प्रस्ताव कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी तयार केला होता. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकार्यांसोबत जागेचे सर्वेक्षण केले होते. तत्कालीन कृषी व जलसंधारण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. हा प्रस्ताव तेव्हापासून पुढे सरकलाच नाही. कृषी विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील विद्यापीठाची शेकडो हेक्टर शेती पडीक पडली आहे. विद्यापीठाने या ठिकाणी बांधलेला तलावदेखील पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेकदा वाहून गेला आहे.
कृषी विद्यापीठाने या भागात आवळा लागवडीचा प्रयोग केला होता. तथापि, तो प्रयोग फसला आहे. या भागाकडे कृषी विद्यापीठाचे लक्ष नसल्याचेच वारंवार निदर्शनास येत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या बाभुळगाव सर्कल सदस्य सरला मेश्राम यांनी या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करू न जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडे पाठविला. येत्या २८ नोव्हेंबर रोजी या बंधार्याच्या पाणलोट क्षेत्राची पाहणी करण्यात येणार आहे.