पश्चिम व-हाडातील पिकांवर आता धुक्याचे संकट!
By Admin | Updated: January 3, 2015 00:46 IST2015-01-03T00:46:47+5:302015-01-03T00:46:47+5:30
शेतकरी हवालदिल; धुक्यामुळे हरभरा, गहू संकटात.

पश्चिम व-हाडातील पिकांवर आता धुक्याचे संकट!
ब्रम्हानंद जाधव/मेहकर
आद्र्रतायुक्त धुक्याचे प्रमाण वाढल्यामुळे पश्चिम वर्हाडातील हरभरा, गहू या पिकांसह कांदा, फुलकोबी ही भाजिपालावर्गीय पिकेही धोक्यात आली आहेत.
पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांना पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामात झळ सोसावी लागली होती. अत्यल्प पावसामुळे यावर्षी रब्बी पेरणीचे क्षेत्रही घटले. ओलिताची सोय असलेले शेतकरीच रब्बी पेरणी करू शकले. कोरडवाहू शेती असलेल्या बहुतांश शेतकर्यांनी रब्बी पेरणीला बगल दिली. त्यामुळे पश्चिम वर्हाडात ५ लाख ५५ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावरच रब्बी पेरणी झालेली आहे. त्यापैकी सर्वाधिक २ लाख १२ हजार २८१ हेक्टर क्षेत्रावर हरभरा असून, ७६ हजार ५३८ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा आहे. थोड्याबहुत प्रमाणात कांदा, फुलकोबी या भाजिपालावर्गीय पिकांचाही समावेश आहे.
पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तिन्ही जिल्ह्यात गत तीन ते चार दिवसांपासून हवामानात अचानक बदल जाणवत असून, आद्र्रतायुक्त धुक्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हरभरा व गहू पिकाची फुले करपून जात आहेत. यामुळे गव्हावर तांबेरा रोगाचे आक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. कांदा पिकाची फुले करपून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, फुलकोबीवर लारव्हल अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पश्चिम वर्हाडात रब्बी पेरणीच्या सुरूवातीला अत्यल्प पावसामुळे तूर पिकाला फटका बसला. आता काही ठिकाणी अवकाळी, तर काही ठिकाणी गारपीटीचा तडाखा बसल्याने हरभरा व गहू पिकाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
*उत्पादनात ६५ टक्के घट
आद्र्रतायुक्त धुक्यामुळे हरभरा, गहू, कांदा, फुलकोबी या पिकांचे उत्पादन साधारणत: ६0 ते ६५ टक्के घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
*३ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात
पश्चिम वर्हाडात एकूण ५ लाख ५५ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गहू ५१ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावर, तर हरभरा १ लाख १६ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर आहे. अकोला जिल्ह्यात गहू ५ हजार ८३७ हेक्टर क्षेत्रावर आणि हरभरा ४५ हजार १८८ हेक्टर क्षेत्रावर आहे. वाशिम जिल्ह्यात गहू १८ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रावर, तर हरभरा ५0 हजार २२९ हेक्टर क्षेत्रावर आहे. पश्चिम वर्हाडात एकूण २ लाख ८८ हजार ८१९ हेक्टर क्षेत्रावरील गहू आणि हरभरा धुक्यामुळे धोक्यात आला आहे.