मुलीकरीता मोबाइल आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 16:17 IST2021-12-20T16:17:34+5:302021-12-20T16:17:40+5:30
Accident News : शेख राजिक शेख अमीर (रा. हाता, ता. बाळापूर वय ३६) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.

मुलीकरीता मोबाइल आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू
लोहारा (अकोला ) : मुलीला ऑनलाइन शिक्षणाकरीता मोबाइल आणण्यासाठी शेगाव येथे गेलेल्या एका व्यक्तीचा परत येत असताना लोहारानजीक दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शेख राजिक शेख अमीर (रा. हाता, ता. बाळापूर वय ३६) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
शेख राजिक शेख अमीर हे रविवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीने शेगाव येथे गेले होते. परत येत असताना लोहरा गावानजीकच्या मन नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या पुलाला संरक्षण कठडे नसल्याने ते दुचाकीसह खाली पडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी शौचास गेलेल्या लोहारा येथील ग्रामस्थांना पुलाखाली दुचाकीसह पडलेले शेख राजिक शेख अमीर दिसून आले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच उरळ ठाणेदार अनंत वडतकर व पोलीस कर्मचायांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेगांव येथील सई बाई मोटे रुग्णालयात पाठविले.