जन्मदात्याने केली तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या; आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:35 IST2018-12-04T15:32:20+5:302018-12-04T15:35:04+5:30
पातुर (जि. अकोला) : कौटुंबिक कलहातून जन्मदात्या बापाने स्वत:च्या तीन वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नव्हे, तर स्वत:ची आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले.

जन्मदात्याने केली तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या; आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला
पातुर (जि. अकोला) : कौटुंबिक कलहातून जन्मदात्या बापाने स्वत:च्या तीन वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नव्हे, तर स्वत:ची आई व पुतणीवरही प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. ही धक्कादायक घटना पातुर शहरातील गहिलोत नगर भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. मयुरी गोपाल बेलुलकर असे मृत मुलीचे नाव आहे. पातुर पोलिसांनी आरोपी बाप गोपाल बेलुलकर (३०) याला ताब्यात घेतले असून, जखमी आई व पुतणी यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पातुर शहरातील विश्रामगृहाजवळच्या गहिलोत नगरात गोपाल शंकर बेलुलकर हा राहतो. सोमवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास त्याने कौटुंबिक कलहातून तीन वर्षीय मुलगी मयुरी बेलुलकर हिचा गळा दाबून खुन केला व तीचा मृतदेह घराबाहेर फेकून दिला. यावेळी त्याने घरातच झोपलेल्या त्याची आई शंकुतला बेलुलकर यांना घरामागे साप निघाल्याचे सांगून झोपेतून उठविले आणि हातपाय बांधून मारहाण केली. हा प्रकार पाहुन त्याच्या घरात राहत असलेल्या त्याच्या मोठ्या भावाची मुलगी गायत्री बाबुराव बेलुलकर (१५) ही जागी झाली. गोपालने गायत्री हीच्यावरही नॉनचॉपरने हल्ला केला. यावेळी आईने आरडा-ओरड केल्याने शेजारी धावून आले. शेजारी आल्याचे पाहून गोपालने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. गोपालने पोलिसांसमोर कबुली दिली असून, हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेली त्याची आई शकुंतला बेलुलकर व पुतणी गायत्री बेलुलकर यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पातुर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.