शेतक-यांना मिळणार नादुरुस्त रोहित्र वाहतुकीचा खर्च!
By Admin | Updated: January 22, 2016 01:25 IST2016-01-22T01:25:27+5:302016-01-22T01:25:27+5:30
वाहतुकीपोटी येणारा खर्च महावितरणकडून देण्याचे ऊर्जामंत्र्याचे निर्देश.

शेतक-यांना मिळणार नादुरुस्त रोहित्र वाहतुकीचा खर्च!
अतुल जयस्वाल/अकोला : शेतशिवारांमध्ये बसविलेले रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी नेण्याची जबाबदारी महावितरणची असली, तरी अनेकदा शेतकरी स्वत: ते महावितरणच्या जिल्हापातळीवरील दुरुस्ती केंद्रापर्यंत दुरुस्तीसाठी नेतात. या वाहतुकीपोटी येणारा खर्च संबंधित शेतकर्यांना महावितरणकडून देण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शेतकर्यांना सिंचन करता यावे, यासाठी महावितरणकडून शेतशिवारांमध्ये वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. कृषिपंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा, याकरिता वेगवेगळय़ा क्षमतेची विद्युत रोहित्रे बसविण्यात आली आहेत. शेतकर्यांना रब्बी तसेच काही प्रमाणात खरीप हंगामातही सिंचनासाठी कृषिपंप सातत्याने सुरू ठेवावे लागतात. एकाच वेळी सर्व कृषिपंप सुरू राहिल्याने रोहित्रांवरील दाब वाढल्यामुळे ती नादुरुस्त होतात. अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये ऐन हंगामात रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. ऐन हंगामात रोहित्र नादुरुस्त झाल्यास, तातडीने दुरुस्त करून शेतकर्यांना अव्याहतपणे विजपुरवठा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे; तथापि या कामात महावितरणकडून दिरंगाई होते. त्यामुळे अनेकदा शेतकरी स्वखर्चाने नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी महावितरणच्या जिल्हास्तरावरील दुरुस्ती केंद्रात नेतात. त्यांना रोहित्राच्या वाहतुकीसाठी येणारा खर्च महावितरणकडून दिला जात नाही. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर नादुरुस्त रोहित्राच्या वाहतुकीसाठी शेतकरी खर्च करत असतील, तर तो खर्च त्यांना महावितरणकडून देण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकार्यांना अकोला व वाशिम जिल्ह्याच्या दौर्यावर असताना दिले. ६३ केव्हीऐवजी बसणार १00 केव्हीचे रोहित्र शेतकर्यांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी शेतशिवारांमध्ये बहुतांश ६३ केव्ही क्षमतेची रोहित्रे बसविण्यात आली आहेत. आता यापुढे सदर रोहित्रे नादुरुस्त झाल्यास त्याऐवजी १00 केव्ही क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी १00 केव्हीचे रोहित्र उपलब्ध होऊ शकले नाही, तर त्या ठिकाणी पूर्वीचे ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र दुरुस्त करण्यात येईल व ६३ केव्ही क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.