तुरीच्या मापासाठी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला!
By Admin | Updated: May 24, 2017 01:41 IST2017-05-24T01:41:28+5:302017-05-24T01:41:28+5:30
‘नाफेड’ची खरेदी संथ गतीने : खरेदी केंद्रांवर टॅ्रक्टरच्या रांगा कायम

तुरीच्या मापासाठी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला!
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत १४ दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली; मात्र तुरीचे मोजमाप संथ गतीने सुरू असल्याने, जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर तुरीच्या टॅ्रक्टरच्या रांगा कायम असून, तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबत प्रतीक्षा करीत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीलाच आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी बंद करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करून शासनामार्फत तूर खरेदी सुरू करण्यात आली होती; परंतु शेतकऱ्यांकडील तूर हमीदराने ‘नाफेड’द्वारे ३१ मेपर्यंत खरेदी करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर गत ९ मेपासून ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेडद्वारे बंद करण्यात आलेली तूर खरेदी पुन्हा सुरू झाल्याने खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली; परंतु ‘नाफेड’द्वारे खरेदीत तुरीचे मोजमाप अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने खरेदी केंद्रांवर तुरीच्या ट्रॅक्टरच्या रांगा वाढत असून, तुरीच्या मोजमापासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाळा तोंडावर आल्याच्या परिस्थितीत खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप केव्हा होणार, असा प्रश्न प्रतीक्षा करीत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.
१३ दिवसांत ४२ हजार क्विंटल तूर खरेदी!
नाफेडद्वारे जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर गत ९ मेपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. २२ मेपर्यंत १३ दिवसांच्या कालावधीत पाचही खरेदी केंद्रांवर ४२ हजार ४६७ क्विंटल तूर नाफेडद्वारे खरेदी करण्यात आली आहे.
तूर भिजण्यापासून वाचविण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान!
पावसाळा तोंडावर आला असल्याच्या परिस्थितीत सायंकाळच्या वेळी निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणात अवकाळी पाऊस आल्यास खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरमधील तूर भिजण्याची भीती आहे. त्यामुळे तूर भिजण्यापासून वाचविण्याचे आव्हान जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्यास टॅ्रक्टरमधील तूर ताडपत्रीने झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.
अकोल्यात ६९६ तुरीचे ट्रॅक्टर उभे; तूर भिजण्याचे संकट!
‘नाफेड’द्वारे तूर खरेदीत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रावर अकोला, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यातील तूर खरेदी करण्यात येत आहे.
२३ मेपर्यंत या खरेदी केंद्रावर ६९६ तुरीचे ट्रॅक्टर उभे असून, तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तूर खरेदी केंद्रांवर आहे.
ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यास ट्रॅक्टरमधील तूर भिजणार असल्याचे संकट तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.