पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:00+5:302021-07-10T04:14:00+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही काही शेतकऱ्यांना ...

पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद !
संजय उमक
मूर्तिजापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही काही शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
तालुक्यात गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत येत असतानाच अति पाऊस व अवकाळी पावसामुळे पिंकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यावेळी प्रशासनामार्फत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानाचे पंचनामेही केले होते. शासनाच्या सूचनेनुसार हजारो शेतकऱ्यांनी नुकसानाचे अर्ज कृषी विभागाच्या तालुका कार्यालयात जमा केले होते. तसेच अंतिम पैसेवारीही ५० पैशांच्या आत होती. त्यामुळे पीकविमा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाल्यानंतरही संरक्षित पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
---------------------------
१५ जुलै अंतिम मुदत
प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेमध्ये सहभागाची अंतिम तारीख १५ जुलैपर्यंत असली तरी शेतकऱ्यांनी शुक्रवारपर्यंत बँकेत जाऊन स्वत:चे घोषणापत्र व संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
-------------------------
बॅंक भरणार विम्याचा हप्ता
ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे पीक कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा हप्ता सेवा सहकारी सोसायटीमार्फत बॅंक भरणार आहे. या हप्त्याचा परतावा कर्जाची रक्कम भरते वेळ बॅंकेत जमा करणे अनिवार्य असणार आहे. जर मुदतीपूर्वी भरणा परतावा केला नाही, तर याही पैशाला व्याज दर आकारण्यात येणार आहे. परंतु सद्य:स्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. यासाठी केवळ शेतकऱ्यांनी आधारकार्ड व सातबारा बॅंकेकडे मुदतीच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
-----------------
गतवर्षी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. कुठल्याही विमा कंपनीचा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी बांधावर पोहोचला नाही. यात विमा कम्पन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. यावर्षी विमा काढावा, की नाही, अशी द्विधा मन:स्थितीत आहे.
-रूपराव रामरावजी मेहरे, शेतकरी, सिरसो
----------------------
विमा कंपनीने रॅन्डम प्लॉटपाडून सोयाबीन उत्पन्न जास्त झाल्याचे सांगून विमा नाकारला. या प्लॉटची यादी कंपनीकडे मागितली, तर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. विमा अद्यापही मिळाला नाही. याबाबत कंपनीशी संपर्क केला, तर केंद्र शासनाकडूनच पैसा उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जाते. विमा काढणे गरजेचे असून, त्यात शेतकऱ्याचा फायदाच होईल.
- राजू वानखडे, शेतकरी, जांभा
--------------------
गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. या सर्व शेतकऱ्यांना मूग, उडीद, तूर या पिकांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे. कपाशीचा विमा केवळ शेलू बाजार, कुरुम, माना, लाखपुरी या सर्कलला मिळाला, सोयाबीन विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत पीकविमा भरावा.
-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर