शेतक-यांनो, नव कृषी तंत्रज्ञानाची कास धरा - वसंतराव धोत्रे
By Admin | Updated: January 28, 2017 02:18 IST2017-01-28T02:18:06+5:302017-01-28T02:18:06+5:30
अकोल्यात वसंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन.

शेतक-यांनो, नव कृषी तंत्रज्ञानाची कास धरा - वसंतराव धोत्रे
अकोला, दि. २७- शेतकरी, शेतमजुरांच्या श्रमावरच देशात कृषी क्रांती झाली आहे. अर्थात त्याला तंत्रज्ञान, संशोधनाची जोड आहेच; पण आता नव कृषी तंत्रज्ञान, संशोधनाचे वारे वेगाने वाहत असून, दररोज नवीन प्रयोग शेतीत केले जात आहेत. जगाशी स्पर्धा करायची असेल, तर शेतकर्यांनी या नव्या तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. शेतकर्यांपर्यंंत हे नवे तंत्रज्ञान पोहोचावे, हाच प्रामाणिक हेतू डोळ्यांसमोर ठेवून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे यांनी शुक्रवारी येथे केले.
वसंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी धोत्रे बोलत होते. व्यासपीठावर अकोला
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, उद्योजक बसंत बाछुका, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर,डॉ. अनंतराव भुईभार, जगन्नाथ कराळे, सेवकराम ताथोड, रामसिंग जाधव, दादाराव देशमुख व नामदेवराव अढाऊ आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना धोत्रे म्हणाले, ज्या मजुरांच्या श्रमावर कृषी क्रांती झाली, तो मजूरवर्ग आता शेतात काम करण्यासाठी मिळत नसल्याने, शेतकर्यांना यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा लागत आहे. शेतकर्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसून, देशात आर्थिक विषमतेची दरी वाढली आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून नियोजन असावे लागते; पण अलीकडे शेतकर्यांचा कणा मोडणारेच निर्णय होत असल्याचे टीकास्त्र त्यांनी अप्रत्यक्ष सरकारवर सोडले.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधीलकी जोपासत शेतकर्यांच्या वेदनेशी नातं जोडलं असून, शेतकर्यांचा पैसा शेतकर्यांच्याच कामी यावा, यासाठीच्या योजना सुरू केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना आद्गथक मदत, वीज पडून अथवा सर्पदंशाने शेतकरी दगावला असेल, तर त्यासाठीही मदत, शेतकर्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कृषी अवजारे, यंत्रासाठी अनुदान दिले जात आहे. कृषी प्रदर्शनातून माहिती घेऊन शेतकर्यांनी आधुनिक शेती करावी, हा उपक्रमही सुरू केला असल्याचे ते म्हणाले.
डॉ. कोरपे यांनी शेतकर्यांना नव तंत्रज्ञान, संशोधन अवगत करू न शेती करण्याचे आवाहन केले. शेतकरी, व्यापारी, अडत यांचा समन्वय राखत या बाजार समितीने शेतकर्यांशी सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. जगाशी स्पर्धा करण्यासाठी शेतकर्यांनी सज्ज व्हावे, असे ते म्हणाले. प्रास्ताविकातून शिरीष धोत्रे यांनी कृषी प्रदर्शनामागील भूमिका विशद केली. त्यांनी बाजार समिती शेतकर्यांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
२४0 दालने
चार एकरावर चार दिवस कृषी प्रदर्शन चालणार असून, नव तंत्रज्ञान, संशोधन, बचत गट, कृषी यंत्र आदींचे २४0 दालने येथे शेतकर्यांसाठी उपलब्ध आहेत. विविध पिके, संशोधन, तंत्रज्ञान विषयांवर १५ चर्चासत्र येथे ठेवण्यात आली आहेत. शेतकर्यांना देश, राज्य पातळीवरील शेती तज्ज्ञांसह कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.