शेतक-यांना मुलामुलींचे शिक्षण, लग्न खर्चाची चिंता!

By Admin | Updated: November 29, 2014 22:05 IST2014-11-29T22:05:48+5:302014-11-29T22:05:48+5:30

नापिकीमुळे आर्थिक संकट: वाट कशी काढणार?

Farmers are concerned about the education of children, the cost of marriage! | शेतक-यांना मुलामुलींचे शिक्षण, लग्न खर्चाची चिंता!

शेतक-यांना मुलामुलींचे शिक्षण, लग्न खर्चाची चिंता!

संतोष येलकर/अकोला
पावसाचे उशिरा झालेले आगमन, त्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस, गरज असताना पावसाने मारलेली दडी अन् गरज नसताना काही भागांमध्ये झालेली अतवृष्टी, या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या लहरीपणाची प्रचिती देत, निसर्गाने यावर्षी खरिपापाठोपाठ रब्बीची पिकांनाही जबर तडाखा दिल्याने, राज्यातील शेतकरी पुरता कोलमडला असून, त्याला मुलामुलींचे शिक्षण, विवाहादी खर्चाची चिंता भेडसावू लागली आहे.
राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या सहा महसूली विभागांतर्गत जिल्ह्यांमधील एकूण ३९,४३४ गावांची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तब्बल १९,0५९ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यातल्या सर्वच म्हणजेच ७, २४१ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील २,0२९ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. राज्यातील एकूण १९,0५९ गावांमध्ये पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत संसाराचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक संकटातून वाट कशी काढावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
राज्य शासनाने ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९,0५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली असून, त्या गावांसाठी वेगवेगळ्या सवलती लागू करण्यासही मंजूरी दिली आहे. त्यानुसार शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असले तरी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी येणारा खर्च, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च, तसेच मुला-मुलींचे विवाह यासाठी येणारा खर्च कसा भागविणार, ही चिंता दुष्काळी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकर्‍यांना सतावत आहे.

अमरावती विभागातील जिल्हानिहाय टंचाईसदृश गावे!
जिल्हा गावे
अमरावती            १९८१
अकोला                  ९९७
यवतमाळ             २0५0
बुलडाणा               १४२0
वाशिम                   ७९३
............................
एकूण                    ७२४१

Web Title: Farmers are concerned about the education of children, the cost of marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.