बाजारभावापेक्षा सवलतीची तूर डाळ महाग !
By Admin | Updated: August 23, 2016 01:16 IST2016-08-23T01:16:26+5:302016-08-23T01:16:26+5:30
बाजार भावापेक्षा सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणारी तूर डाळ महाग; ८ ते ३३ रुपयांची तफावत.

बाजारभावापेक्षा सवलतीची तूर डाळ महाग !
संतोष येलकर
अकोला, दि. २२: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात प्रती १0३ रुपये किलो दराने तूर डाळ वितरित करण्यात येत आहे; मात्र बाजारात ७0 ते ९५ रुपये प्रती किलो दराने तूर डाळ विकली जात आहे. त्यामुळे बाजार भावापेक्षा सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणारी तूर डाळ महाग ठरत असल्याने, जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक रास्त भाव दुकानातून ही डाळ कशी घेणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गत २१ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील बीपीएल शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेंतर्गत प्रतिमाह प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात १२0 रुपये दराप्रमाणे एक किलो तूर डाळ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाच्या ६ ऑगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार सवलतीच्या दरातील तूर डाळ १0३ प्रती किलो दराने वितरित करण्याचे निश्चित करण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात ९५ हजार ६९२ बीपीएल आणि अंत्योदय योजनेंतर्गत ४४ हजार ७८१ असे एकूण १ लाख ४0 हजार ४७३ शिधापत्रिकाधारक आहेत. शासन निर्णयानुसार या शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरातील तूर डाळीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना ऑगस्ट महिन्यात सवलतीच्या दरात तूर डाळीचे वितरण करण्यासाठी २ हजार ३९ क्विंटल तूर डाळीचा साठा २0 ऑगस्ट रोजी प्राप्त झाला. उपलब्ध झालेला तूर डाळीचा साठा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना वितरित करण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे; परंतु सवलतीच्या दरात प्रती किलो १0३ रुपये दराने तूर डाळ वितरित केली जात असतानाच, बाजारात मात्र केवळ ७0 ते ९५ रुपये किलो दराने तूर डाळ विकली जात आहे. बाजारभावाच्या तुलनेत सरकारच्या सवलतीच्या दरातील तूर डाळ जादा दराने मिळत असल्याने, जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थी रास्त भाव दुकानांमधील सवलतीच्या दरातील तूर डाळ कशी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.