दंतचिकित्सा विभागातील १३० अस्थायी पदांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:24 IST2020-06-19T18:24:06+5:302020-06-19T18:24:27+5:30
३० अस्थायी पदांना आणखी तीन महिन्यांची अर्थात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दंतचिकित्सा विभागातील १३० अस्थायी पदांना मुदतवाढ
अकोला : आरोग्य सेवा, अकोला मंडळांतर्गत येणाऱ्या ६० आरोग्य संस्थांमधील दंतचिकित्सा विभागातील तब्बल १३० अस्थायी पदांना आणखी तीन महिन्यांची अर्थात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या दंतशल्य चिकित्सक वर्ग एक व दोन, सहायक (गट ड), अधिपरिचारिका व दंत यांत्रिकी (गट क) या पदांचा समावेश आहे.
अकोला आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक यांच्या अधिपत्याखालील या १३० पदांना १ आॅक्टोबर २०१९ ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना संकटात निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणीमुळे वित्त विभागाकडून सर्व विभागाच्या अस्थायी पदांना ३१ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपुष्टात आल्यामुळे आरोग्य विभागाकडून या १३० अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार १ जून २०२० ते ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.