घरगुती सिलिंडरमधील गॅस ऑटोमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:48+5:302021-02-05T06:16:48+5:30
दहशतवादविरोधी पथकाची कारवाई अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरात एका घरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा गॅस ...

घरगुती सिलिंडरमधील गॅस ऑटोमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरात एका घरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा गॅस शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये भरून देण्यात येत असल्याच्या माहितीवरून दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. या ठिकाणावरून तीन ऑटोसह, घरगुती गॅस सिलिंडर व यंत्रसामग्री असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुने शहरातील वाशिम बायपास येथील रहिवासी शफिक खान जमील खान हा त्याचा घरामध्ये शासनाच्या अनुदानावर असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरमधून शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये गॅस भरून देऊन मोठ्या प्रमाणात काळाबाजार करीत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकून तीन (एम एच 30 एए 6265, एम एच 30 एए 7320 आणि एम एच 30 एए 5424) ऑटोमध्ये गॅस भरत असताना रंगेहाथ पकडले. या ठिकाणावर आरोपी शकील खान जमीर खान, रा. जुने शहर, शेख इमरान शेख यावर, मुजमिल कुरेशी मेहबूब भाई, इकरान हुसेन इक्बाल हुसेन, सर्व रा. जुने शहर यांच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक अधिनियम कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून तीन ऑटोसह तीन मशीन, चार गॅस सिलिंडर, एक तराजू काटा व पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.