भाजप लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन मिशन
By Admin | Updated: May 25, 2017 01:24 IST2017-05-25T01:24:08+5:302017-05-25T01:24:08+5:30
राज्यात १२ हजार विस्तारक : अकोट येथे प्रशिक्षण वर्ग

भाजप लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन मिशन
विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या. या योजना पारदर्शकपणे राबवूनही भाजपाला अनेक ठिकाणी विरोध पत्करावा लागत आहे. नोटाबंदी, तूर खरेदी तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य, सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षाने घेतलेली भूमिका पाहता, भाजपाचा सकारात्मक चेहरा असतानाही जनतेत नकारात्मक पडसाद उमटत आहेत. या पडसादाचे उत्तर शोधण्यासाठी भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन राज्यभर केले जाणार आहे. त्याकरिता राज्यात ११ हजार ५०० विस्तारक पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.
लोकप्रतिनिधी शेवटच्या घटकापर्यंत भाजपाचे सकारात्मक कार्य पोहोचविण्याकरिता कमी पडत आहेत का, याचे मूल्यमापन मिशन, संवाद शिवार यात्रा, कार्य विस्तार योजना, धुऱ्यावरची चर्चा असे विविध अभियान राबवून जनतेच्या मनातील उकल केली जाणार असल्याचा सूर अकोट येथे पं. दीनदयाल शताब्दी कार्य विस्तार योजनेच्या माध्यमातून आयोजित विस्तार व प्रशिक्षण वर्ग शिबिरात ऐकावयास मिळाला. केंद्र व राज्य सरकारने विविध योजना आणलेल्या आहेत. १२ रुपयांच्या विमा पॉलिसीपासून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकहितार्थ आहेत; परंतु या योजना गावागावांतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात अनेक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. विरोधकांच्या तुलनेत लोकप्रतिनिधींचे कार्य कमी पडत असल्याने विरोधक भाजपवर तोंडसुख घेत आहेत. अशा स्थितीत भाजपला भविष्यातील निवडणुकांमध्ये कुठलाही फटका बसू नये, या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतात की नाही, याकरिता राज्यभर लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन करण्याकरिता तसेच भाजपचे कार्य, योजना घराघरांत पोहोचविण्याकरिता देशभर विस्तारक नेमले जात आहेत. त्या माध्यमातूनच त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता राज्यभर जिल्हा पातळीवर प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत. भाजपा वर वर केवळ योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता व संघटन बांधणीकरिता विस्तारक नेमत असल्याचे दाखवित असले, तरी भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन करण्याकरिताच हा खटाटोप सुरू असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत. विशेष म्हणजे, आमदार गिरीश व्यास यांनीसुद्धा या विस्तारकांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती दिली जाणार. शिवाय, जनतेकडून लोकप्रतिनिधींच्या कार्याबाबत टिप्पण आल्यास पक्षश्रेष्ठींकडून त्याचे मूल्यमापन केले जाणार असल्याच्या दुजोरा दिला आहे.
कार्य विस्तारकांच्या माध्यमातून जनतेशी संवाद
भाजपाचे कार्य विस्तार योजना २५ मे ते ७ जून या कालावधीत संपूर्ण देशभर राबविल्या जाणार आहे. या योजनेंतर्गत भाजपाचा कार्यकर्ता आपल्या घरापासून दूर सर्वसामान्य नागरिकांसोबत राहून केंद्र व राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजना, भाजपाचे विचार पोहोचविणार आहे. जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीसतथा आमदार गिरीश व्यास यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
या कार्य विस्तार योजनेकरिता केंद्रातील मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, केंद्र व राज्यातील पदाधिकारी शिवार संवाद यात्रा, तालुका ते गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा करणार आहेत. त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. शिवाय, केंद्र व राज्य सरकारच्या त्यांच्याकरिता असलेल्या योजनांची माहिती देणार आहेत. ही कार्य विस्तार योजना राबविताना लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचे उद्घाटन, भूमिपूजन करणार नाहीत. केवळ संवादाचे आदान-प्रदान केले जाणार आहेत. या कार्य विस्तार योजनेच्या वेळी संवाद साधताना लोकप्रतिनिधींबाबत काही तक्रारी असतील, त्याही ऐकून घेतल्या जाणार आहेत. योजनेदरम्यान गोळा झालेली माहिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविली जाणार आहे. कार्य विस्तार योजना व्यापक स्वरूपात राबविली जात असल्याने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेसुद्धा अकोला येथे येणार असल्याचे आमदार गिरीश व्यास यांनी सांगितले. कार्यविस्तार योजनेमध्ये विस्तारक म्हणून काम करण्यास ११ हजार ५०० कार्यकर्ते तयार असून, त्या कार्यकर्त्यांना रहिवासी कार्यक्षेत्र सोडून इतर भागात पाठविले जाणार आहे. शिवाय, भाजपाने ४० प्रवक्त्यांची टीम तयार केली असून, ही टीम माध्यमांच्या संपर्कात राहणार आहे. देशपातळीवर कार्य विस्तार योजना राबविली जात असून, त्याचे प्रशिक्षण वर्ग सध्या विविध राज्यात घेण्यात येत आहेत.