European swan birds arrive at Kapshi Lake | युरोपियन राजहंस पक्ष्यांचे कापशी तलावावर आगमन
युरोपियन राजहंस पक्ष्यांचे कापशी तलावावर आगमन

ठळक मुद्देसध्याच्या स्थितीत कापशी तलावात सुमारे ३४ पक्ष्यांचा थवा दिसून येत आहे. ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करून अकोलामध्ये आले आहेत. थंडीमुळे हे पक्षी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी स्थलांतर करतात.

- नीलिमा शिंगणे-जगड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: थंडी वाढताच तलावांवर स्थलांतरित पक्षी दिसून येऊ लागले आहेत. शहरापासून जवळच दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशिम रोड मार्गावरील कापशी तलावावर युरोप येथून बार हेडेड गुज पक्ष्यांचा (राजहंस) थवा दाखल झाला आहे. हे पक्षी तब्बल चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून आणि हिमालयाच्या ३० हजार फूट उंचीवरून अकोला येथे दाखल झाले आहेत.
रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कापशी तलावामध्ये पक्षी मित्र तथा आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, विवेक कोकाटे व त्यांच्या पत्नी, डॉ. जिराफे यांना पक्षी निरीक्षण करताना बार हेडेड गुज पक्ष्यांचा थवा दिसला. मंगोलिया, सायबेरिया, रशिया, अलास्का, युरोप आदी उत्तरीय ध्रुवाकडील देशामध्ये या कालावधीत मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. यामुळे खाद्यासाठी पक्षी स्थलांतर करतात. यात भारतात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. सध्याच्या स्थितीत कापशी तलावात सुमारे ३४ पक्ष्यांचा थवा दिसून येत आहे.
बार हेडेड गुज हे पक्षी युरोप येथील विशेषत: मंगोलिया येथून सुमारे ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करून अकोलामध्ये आले आहेत. हिमालयाच्या साधारण ३० हजार फूट उंचीवरून ते उडतात. अशा वातावरणात आॅक्सिजनचे प्रमाण फार कमी असते. वाºयाचा प्रचंड वेग असतो. या पक्ष्यांचे मान हलविणे व चालणे पाहणाऱ्यांना आकर्षित करते. मानेवर काळ्या रंगाचा बारसारखा दिसणारा पट्टा असतो. म्हणून याला बार हेडेड गुज म्हणतात. हिंदीमध्ये याला राजहंस म्हणतात. ८ हजार उंचीवरून उडणारा एकमेव पक्षी आहे.
हे विदेशी पक्षी सर्वसाधारणपणे युरोप, दक्षिण आफ्रिका या खंडांसह सायबेरिया, अफगाणिस्तान व हिमालय या भागातून स्थलांतर करून आपल्याकडे येतात. त्यांच्या मूळ प्रदेशात या काळात कमालीची थंडी किंवा काही ठिकाणी हिमवृष्टी होत असते. त्यामुळे तेथील पक्षी जीवन बाधित होते. त्यांना खाद्यान्नाचा तुटवडा भासू लागतो. त्यांच्या मूळ जागी पडत असलेल्या थंडीमुळे हे पक्षी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी स्थलांतर करतात. आपल्याकडील थंडीचा पक्षी येण्या-जाण्याशी संबंध नाही. हे स्थलांतरित पक्षी निवडक जलस्थाने, माळरानांवर आपले अन्न शोधतात. पुढील तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे पक्षी पुन्हा आपल्या मूळस्थानी परततात. दरवर्षी हाच क्रम अनुभवण्यास मिळतो, अशी माहिती लक्ष्मीशंकर यादव यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली.

Web Title: European swan birds arrive at Kapshi Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.