हंगाम संपण्याच्या मार्गावर; नाफेडचे खरेदी केंद्र उघडले नाहीत
By Admin | Updated: November 10, 2014 01:43 IST2014-11-10T01:31:50+5:302014-11-10T01:43:21+5:30
अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांची व्यापा-यांकडे धाव.

हंगाम संपण्याच्या मार्गावर; नाफेडचे खरेदी केंद्र उघडले नाहीत
विवेक चांदूरकर/अकोला
मूग, उडीद व सोयाबीन विक्रीचा हंगाम संपत आला असला तरी अद्याप शासनाच्यावतीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. आधीच अल्प हमीभाव जाहीर करून दुष्काळाच्या काळात शेतकर्यांची खिल्ली उडविण्यात आली असून, खरेदी केंद्र बंद ठेवून शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात येत आहे. यावर्षी निसर्गाने शेतकर्यांना दगा दिला. अनियमित व अल्प पाऊस झाल्यामुळे पिकांची प्रचंड हानी झाली. उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही घट आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शासनाने यावर्षी अल्प हमीभाव जाहीर केले. त्यामुळे बाजारपेठेतही पिकांना कमी भाव मिळत आहेत. अनेकदा हमीभावावर बाजारपेठेतील भाव अवलंबून राहतात. यावर्षी कापसाला २७५0 रुपये हमीभाव देण्यात आला आहे तर सोयाबीन २५६0 रुपये, सूर्यफूल ३७५0, ज्वारी १५३0, मका १३१0, मूग ४६00, उडीद ४३५0, तूर ४३५0 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. नाफेडच्यावतीने खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी व्यापार्यांकडे जात आहेत. सोयाबीनची विक्री ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येते. सध्या नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला २७00 ते ३२00 रुपये भाव मिळत आहे. मात्र, बाजारपेठेत हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे खरेदी केंद्र सुरू न करण्याचा नाफेडचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.