आपत्कालीन तेलबिया पिकांचा आता शेतकर्यांना आधार!
By Admin | Updated: July 21, 2014 00:42 IST2014-07-21T00:25:26+5:302014-07-21T00:42:31+5:30
यावर्षी खरीप हंगामासाठी सूर्यफूल, तीळ पिकांचे नियोजन

आपत्कालीन तेलबिया पिकांचा आता शेतकर्यांना आधार!
अकोला : यंदा पावसाळा लांबल्याने अनेक शेतकर्यांना अर्धरब्बीतील तेलबिया पिकांचा आधार वाटत असून, त्यासाठी सूर्यफूल व तीळ या बियाण्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी राज्यात सर्वत्र पावसाला विलंब झाला आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्याची आता कुठे सुरुवात झाली आहे. यापुढे पिकांना लागणारा पाऊस आणि हवामान अनुकूल मिळाले, असे हमखास कुणीच सांगायला तयार नसल्याने अनेक शेतकर्यांनी सोयाबीन पेरणीबाबत आवरता हात घेतला आहे. सोयाबीन शंभर दिवसांचे पीक आहे. आता पेरणी केल्यास हे पीक ऑक्टोबरच्या शेवटपर्यंंत शेतात राहील. पावसाळा मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संपतो. पुढे या पिकाला संरक्षित ओलिताची गरज लागणार आहे. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र ५0 टक्कय़ांनी कमी करू न या क्षेत्रावर उशिरा येणार्या पिकांचे शेतकर्यांनी नियोजन करण्यास हरकत नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सूर्यफूल आणि तीळ ही उशिरा घेता येण्यासारखी तेलबिया पिकं आहेत. १५ ऑगस्टपर्यंंत या पिकांच्या पेरणीचा कालावधी आहे. आपात्कालीन परिस्थितीत सूर्यफूल -तूर (२:१), तीळ -तूर (४:१) हे आंतरपीक प्रयोगाअंती सिद्ध झाल्याने या पद्धतीने या पिकांची पेरणी करावी, असे तेलबिया संशोधकांनी म्हटले आहे. सूर्यफुलात सरळ व संकरित वाण उपलब्ध आहेत. संकरित वाणाचे उत्पादन जास्त मिळत असल्यामुळे शेतकर्यांचा कल या बियाण्यांकडे अधिक आहे. संकरित वाण पारंपरिक क्षेत्रासाठी दरवर्षी उपलब्ध असल्याने शेतकर्यांना बाजारातील संकरित वाणाची निवड करावी लागणार आहे. सूर्यफुलाचे टीएएस-८२,पीकेव्हीएसएफ ९ हे शुद्ध तर संकरित वाणामध्ये पीकेव्ही एसएच २७, केबीएसच १, केबीएसएच ४४, तसेच खासगी कंपन्याचे वाण उपलब्ध आहे. तीळाचीसुद्धा या आपात्कालीन परिस्थितीत उथळ काळ्य़ा व निचर्याच्या जमिनीत १५ ऑगस्टपर्यंंत पेरणी करावी लागणार आहे. एकेटी ६४, जेएलटी-७ किंवा पांढर्या तिळाचे खासगी कंपन्याचे वाण उपलब्ध आहेत. दरम्यान, पेरणी करताना शेतकर्यांना या बियाण्यांना बीजप्रकिया करावी लागणार असून, उगवणशक्ती तपासावी लागणार आहे. या परिस्थितीत शेतकर्यांनी उताराला आडव्या सर्या पाडून टोकण पद्धतीने एक फूट अंतरावर एका ठिकाणी दोन बिया टाकून पेरणी करणे आवश्यक आहे.