विजेच्या तुटवड्यामुळे आपत्कालीन भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 19:19 IST2017-04-29T19:19:04+5:302017-04-29T19:19:04+5:30

गत दोन दिवसांपासून महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद राहत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

Emergency load regulation due to the power shortage | विजेच्या तुटवड्यामुळे आपत्कालीन भारनियमन

विजेच्या तुटवड्यामुळे आपत्कालीन भारनियमन

उकाड्याने नागरिक हैरान : वीजेची मागणी वाढली
अकोला : उन्हाळय़ात वाढलेली वीजेची मागणी पुर्ण करताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत असून, विजेच्या तुटवड्यामुळे जिल्हय़ात महावितरणकडून सर्वच फिडरवर सातत्याने आपत्कालिन भारनियमन करावे लागत आहे. गत दोन दिवसांपासून महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद राहत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
विजेची वाढती मागणी व प्रत्यक्ष पुरवठा यामधील तफावत वाढत असल्याने गत काही दिवसांपासून महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी महावितरणकडून विविध ग्रुपवर आपत्कालीन भारनियमन करण्यात आले. तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना होणार्‍या या भारनियमनामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. शनिवारी भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार, ई, एफ, जी १, जी २, जी ३ या ग्रुपवर टप्प्या-टप्प्याने भारनियमन करण्यात आले. यामुळे विविध फिडरवरील वीज पुरवठा दोन ते तीन तास खंडित होता. सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना नागरिकांकडून विजेच्या उपकरणांचा वापर वाढला आहे. गारवा देणारे कुलर, एसी, पंखे आदी उपकरणे बंद राहिल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, सायंकाळी सर्वच ग्रुपवरील भारनियमन मागे घेण्यात आले.
पाणीपुरवठा विस्कळित
सद्या जिल्हय़ात सर्वत्र पाणीटंचाईचे चित्र आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात आहे. भारनियमनामुळे काही गावांमध्ये योगायोगाने पाणीपुरवठय़ाच्या दिवशीच वीज गुल होते. त्यामुळे त्या गावात त्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकत नाही.

Web Title: Emergency load regulation due to the power shortage