सॉफ्टबॉल स्पर्धेत एमराल्ड विजेता
By Admin | Updated: August 24, 2014 00:46 IST2014-08-24T00:46:40+5:302014-08-24T00:46:40+5:30
जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत ग्रामीण क्षेत्रामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलचे वर्चस्व राहिले.

सॉफ्टबॉल स्पर्धेत एमराल्ड विजेता
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे शनिवार २३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत ग्रामीण क्षेत्रामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलचे वर्चस्व राहिले. १४ व १७ वर्षाआतील मुली व १४ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद एमराल्ड स्कूलने पटकाविले. १४ वर्षाआतील मुलांच्या गटातील अंतिम सामना एमराल्ड हाईटस् स्कूल अकोली खुर्द व सरलाराम काकाणी मूर्तिजापूर संघात झाला. एमराल्डने हा सामना १४-३ अशा गुणांनी जिंकला. मुलींच्या गटातील सामना एमराल्ड स्कूल व सेन्ट अँन्स स्कूल, मूर्तिजापूर संघात होऊन एमराल्डने १९-९ गुणांनी विजय मिळविला. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात नरसिंग विद्यालय आकोट व एमराल्ड स्कूलमध्ये अंतिम सामना रंगला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात नरसिंग विद्यालयाने एमराल्डचा ५-४ ने पराभव केला. मुलींच्या गटातील सामना एमराल्ड स्कूल व शिवाजी विद्यालय राजंदा संघात झाला. एमराल्डने सामन्यावर १0-५ ने विजय मिळविला. १९ वर्षाआतील मुलांच्या गटातील सामना व्यंकटेश बालाजी हायस्कूल मूर्तिजापूर व हरिभाऊ गव्हाणकर विद्यालय संघात झाला. स्पर्धेतील हा सामना प्रेक्षणीय ठरला. १0-८ गुणांनी सामना व्यंकटेश स्कूलने जिंकला. मुलींच्या गटातील सामना जसनागरा पब्लिक स्कूल रिधोरा व शिवाजी विद्यालय राजंदा संघात झाला. १५-५ गुणांनी सामना जसनागरा स्कूलने जिंकला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत पंच म्हणून रामेश्वर राठोड, पंकज कोकाटे, राहुल खंडारे, अमित गोतमारे, सागर निळे, अमोल वानखडे, तेजल खिलोसिया, भूषण गाडगे यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे होत्या. त्यांना प्रशांत खापरकर, राहुल जंगम, निशांत वानखडे यांनी सहकार्य केले.