अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई
By प्रवीण खेते | Updated: September 22, 2022 18:07 IST2022-09-22T18:06:17+5:302022-09-22T18:07:07+5:30
सात ग्राहकांनी टाकले होते थेट आकोडे, १९ ग्राहकांनी केले होते मीटर टँम्पर

अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई
अकोला : वीज चोरट्यांविरुद्ध धडक कारवाई करत महावितरणअकोला शहर विभागाने गोयंका फिडरवर तब्बल २६ वीज चोरी उघडकीस आणल्या. या धाडीत १९ वीज ग्राहकांनी मीटर टँपर केल्याचे ,तर ७ ग्राहक थेट आकोडे टाकून वीज चोरी करत असल्याचे उघड झाले.
अकोला शहर उप विभागात वाढलेल्या वीज चोरीमुळे गोयंका फिडरची वीज हानी ही ७० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. तसेच वीज चोरीमुळे यंत्रणा भारीत होऊन शॉर्ट सर्कीट होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास प्रामाणीकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांना होतो आहे.
शिवाय महावितरणला लाखो रूपयाचे नुकसान होत असल्याने अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट याच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता सुनिल कळमकर यांच्या नेतृत्वात ही वीज चोरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वीज चोरी पकडण्यासाठी एक्युचेकचा वापर करण्यात आल्याने १९ ग्राहकांनी मिटरमध्ये फेरफार केल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय ७ ग्राहकांनी थेट आकोडे टाकून वीज चोरी केल्याचेही निदर्शनास आले.
वीज चोरी पकडण्याच्या भितीने अनेक ग्राहकांनी आपले मीटर जाणीवपूर्व फॉल्टी केल्याचेही निदर्शनास येत आहे.त्यामुळे फॉल्टी मीटर असलेल्या ग्राहकांचेही मीटर तपासण्याची मोहीम हाती घेतली असून वीज चोरी झाल्याचे आढल्यास त्यांच्यावर वीज चोरी अंतर्गत तडजोडीसह वीज चोरीच रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.