एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांच्या वसतिगृहासाठी प्रयत्न
By Admin | Updated: August 24, 2014 01:02 IST2014-08-24T01:02:21+5:302014-08-24T01:02:21+5:30
एचआयव्हीबाधित पालकांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलांचे कायमस्वरूपी संगोपनाची व्यवस्था व्हावी, याकरिता वसतिगृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न

एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांच्या वसतिगृहासाठी प्रयत्न
बुलडाणा : एचआयव्हीबाधित पालकांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलांचे कायमस्वरूपी संगोपनाची व्यवस्था व्हावी, याकरिता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वसतिगृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी दिले. ह्यलोकमतह्ण मध्ये प्रकाशित वृत्तानंतर जिल्हाधिकारी यांनी काल २२ ऑगस्ट रोजी महिला बालकल्याण, आरोग्य विभाग, एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांची एकत्रीत बैठक घेतली. या बैठकीला आयएमएचे राज्य प्रतिनिधी डॉ.जे.बी.राजपूत, डॉ.व्ही.एम.उबरहंडे, डॉ.गजेंद्र निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिवाजी गजरे, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, जिल्हा पर्यवेक्षक गजानन देशमुख, नेटवर्क ऑफ बुलडाणाच्या मंगला उमाळे, गजानन जायभाये, अश्विनी बैरागी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व तहसीलदारांना संबंधित बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे निर्देश याआधीच आपण दिले आहेत; मात्र काही अटींमुळे, अनेकांना असा लाभ मिळणार नाही. या बालकांच्या संपूर्ण संगोपन व आरोग्य विषयक काळजी घेण्याकरिता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वसतिगृहाची निर्मिती करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊ या. महिला बालकल्याण विभागाने यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करून यासंदर्भात पावले उचलावी, असे आवाहन त्यांनी केले. आयएमएने या मुलांना सर्व आरोग्यविषयक सेवा पुरविण्याची ग्वाही या बैठकीत दिली.