इंजेक्शनच्या भीतीने ‘त्याने’ बस स्थानकावर काढली रात्र
By Admin | Updated: September 19, 2014 02:21 IST2014-09-19T02:01:58+5:302014-09-19T02:21:44+5:30
अकोल्यातील मुलाचा प्रकार; वडिलांनी केली होती खदान पोलिस ठाण्यात तक्रार.

इंजेक्शनच्या भीतीने ‘त्याने’ बस स्थानकावर काढली रात्र
अकोला : मुलगा आजारी असल्याने, त्याच्या वडिलांनी त्याला तुला डॉक्टरकडे नेऊन इंजेक्शनच द्यायला लावतो असे म्हटल्याने, इंजेक्शनला घाबरत असलेल्या खदान परिसरातील एका १५ वर्षीय मुलाने घरातून पळ काढत, नवीन बस स्टँड गाठले आणि तिथे त्याने रात्र काढली. मुलगा बराचवेळ पर्यंत घरी न दिसल्याने, कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली; परंतु मुलगा दिसून आला नाही. अखेर त्याच्या वडिलांनी खदान पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदविली. वडील व पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बस स्टँडवर त्याचा शोध घेत असताना, तो एका ठिकाणी एका बेंचवर झोपलेला दिसून आला. त्याला विचारणा केल्यानंतर, त्याने व त्याच्या वडिलांनी घडलेली हकीकत विशद केली. हा मुलगा आजारी असल्याने वडिलांनी त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरला दाखविले. डॉक्टरने औषधं दिलं; परंतु मुलगा औषधं घेत नसल्याने वडिलांनी त्याला बुधवारी सकाळी चांगलंच धारेवर धरलं आणि आता डॉक्टरकडे चल, तुला इंजे क्शनच द्यायला लावतो. अशा भाषेत मुलाल ठणकावलं. मुलालाही आता वडील खरंच डॉक्टरकडे नेणार, इंजेक्शन देणार असं वाटलं. इंजेक्शनची प्रचंड भीती वाटल्याने या मुलाने शिकवणी वर्गाच्या नावाने घरातून पळ काढला आणि थेट बस स्टँड गाठले. त्याने बस स्टँडवर रात्र काढली.