पक्ष्यांच्या स्थलांतरावरही दुष्काळाचा परिणाम !

By Admin | Updated: December 27, 2014 23:52 IST2014-12-27T23:52:16+5:302014-12-27T23:52:16+5:30

अपु-या पावसामुळे बार हेडेड गीज विदर्भात आढळला नाही.

Due to the devastation of birds! | पक्ष्यांच्या स्थलांतरावरही दुष्काळाचा परिणाम !

पक्ष्यांच्या स्थलांतरावरही दुष्काळाचा परिणाम !

दिवाकर इंगोले/ कारंजा लाड:बदलत्या ऋतुमानानुसार पक्षी त्यांना पोषक अशा वातावरणाचा शोध घेत स्थलांतर करीत असतात; परंतु ज्या ठिकाणी हे पक्षी स्थलांतर करतात त्या ठिकाणच्या वातावरणात विविध कारणांनी वेळेपूर्वीच बदल झाला असेल, तर त्याचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावरही होत असल्याचे या संदर्भात पक्षीमित्रांनी केलेल्या निरीक्षणावरून आढळून आले आहे.
विदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध प्रजातीचे पक्षी विदर्भात येत असतात. सैबेरिया, श्रीलंका यासारख्या देशातून ब्लॅकटेल्ड, गॉडबिट, स्पॉटेड रेड शँॅक, इगल, कॉमन टिल, शॉवेलर, ब्ल्यू विंग टेल, बार हेडेड गीज (राजहंस), गार्डन बर्डस आदी पक्ष्यांचा यामध्ये समावेश असतो. रेड श्ॉॅक हा पक्षी युरोपमधून सुमारे आठ हजार किलोमीटरचे अंतर कापून कारंजा तालुक्यात येतो, तर शॉवेलर हा पक्षी सैबेरियातून पाच हजार किलोमीटर अंतरावरून येथे येतो; परंतु यावेळी विदर्भात अपुरा पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, अनेक जलाशयातील पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात घटली, तर कित्येक जलाशय कोरडे ठण्ण पडले आहेत. उथळ पाण्याच्या ठिकाणी मिळणार्‍या अन्नभक्ष्यावर जगणारे पक्षी, यावेळी या भागात पाहायला मिळाले; परंतु इतर महत्त्वपूर्ण अनेक पक्ष्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.
अपुर्‍या पावसामुळे बार हेडेड गीज (राजहंस) हा पक्षी विदर्भात आढळला नाही. हा पक्षी प्रामुख्याने रब्बीच्या हंगामात येणार्‍या पिकांवर ताव मारण्यासाठी विदर्भात येतो; परंतु यावर्षी रब्बी हंगामही बेताचाच असल्याने हा पक्षी या भागात दिसून आला नाही. अफगाणिस्तानातून पाच हजार किलोमीटरचे अंतर कापून येणारा गार्डन बर्डस् हा पक्षी २00२ नंतर प्रथमच या भागात आढळून आला. त्याशिवाय पलाशगल हा पक्षी एका तपानंतर प्रथमच या भागात दिसला.
हवामानाचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर दिसत आहे. अडाण धरणावर केवळ ६ राजहंस पाहायला मिळाले. गत वर्षी ही संख्या ४७ होती. हजारोच्या संख्येने विदर्भात स्थलांतर करणारे आणि मेघदूतच्या महाकाव्यात उल्लेख असणारे चक्रवाक बदक पन्नासच्या जवळपासच आढळले असल्याचे पक्षीमित्र कौस्तुभ पांढरीपांडे यांनी नमूद केले.

 

Web Title: Due to the devastation of birds!