अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथे दारूच्या नशेत मुलाने आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. शेत वाटणीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी तेल्हारापोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विजय समाधान तेलगोटे (वय ३८, रा. घोडेगाव, ता. तेल्हारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ विनोद समाधान तेलगोटे हा दारूच्या नशेत आई-वडिलांशी वारंवार वाद घालत असे. १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता त्याने आई-वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेनंतर तेल्हारा पोलिसांनी जखमींना तेल्हारा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीनंतर २० मार्च रोजी रात्री २.३० वाजता तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अमोल सोळंके करीत आहेत.