शेतीसाठी मजूर देता का मजूर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST2021-01-08T04:56:56+5:302021-01-08T04:56:56+5:30
तालुक्यात मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. तालुक्यात तुरीचे पीक सोंगणीला आले असल्याने पावसामुळे तुरीचे नुकसान होऊ नये, ...

शेतीसाठी मजूर देता का मजूर?
तालुक्यात मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. तालुक्यात तुरीचे पीक सोंगणीला आले असल्याने पावसामुळे तुरीचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी तूर सोंगणीची घाई करीत असल्याचे चित्र आहे. तसेच कापूस वेचणीसाठी आल्याने व कापसाचा प्रतिकोला आठ रुपये वेचणीचा दर असल्याने महिला मजूर कामात व्यस्त आहे. परिणामी, तूर सोंगणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. तूर सोंगणीसाठी तालुक्यातील ग्रामीण भागात मध्य प्रदेशातून मजूर बोलावण्यात आला आहे. मजुरी वाढवूनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
-----------------
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
हरभऱ्यावर फवारणी करण्यासाठी पूर्वी मजुरांचा वापर होत होता. सध्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारणी केली जात आहे. तसेच डवरे व विविध यंत्राच्या साहाय्याने शेती होत असल्याने यंत्रांनी मजुरांची जागा घेतली आहे. ज्या कामासाठी पाच मजूर आवश्यक आहेत. तेथे आता यंत्राद्वारे एक मजूरच काम करीत आहे.
------------------------
कापूस वेचणी व तूर सोंगणीचे कामे एकाच वेळी आल्याने गावात मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. मजुरी वाढवूनही मजूर मिळत नसल्याने शेतमाल शेतात पडून आहे. वातावरणाचा फटका बसत असल्याने उत्पादनात घट होत असल्याने खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
- गोपाल साबळे, शेतकरी, नया अंदूरा
-----------------------------
गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने गावात तूर सोंगणीची धांदलघाई सुरू झाली आहे. परिणामी, गावात मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. उत्पादन होत नसल्याने मजुरी वाढवूनही शेती न परवडणारी झाली आहे.
- शेतकरी, बाळापूर
------------------------
गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, मजूर वर्ग व्यस्त आहे. तसेच कापूस वेचणी, तूर सोंगणी एकाच वेळी आल्याने मजूर मिळत नसल्याने शेतमाल शेतात पडून आहे.
- शेतकरी, बाळापूर
------------------